देशातून आतंकवाद मुळासकट नष्ट केला:मुंबईतल्या बांग्लादेशी रोहींग्याना सुद्धा आम्ही हाकलून देऊ, अमित शहांचा हल्लाबोल

बोरिवली विधानसभा मतदारसंघ येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी तसेच कॉंग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले, कलम 370 हटवण्यासाठी कॉंग्रेसने विरोध केला होता. 370 कलम हटवले तर रक्ताच्या नद्या वाहतील, असे ते म्हणत होते. मात्र असे काहीच झाले नाही. अमित शहा म्हणाले, सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते की मी गृहमंत्री असताना मला काश्मीरमध्ये जायला भीती वाटायची. काही हरकत नाही, आता तुम्ही तुमच्या परिवाराला घेऊन जा, तुमचे केसाला देखील कोणी धक्का लावणार नाही. पंतप्रधान मोदींनी देशातून आतंकवाद मुळासकट नष्ट केले आहे. बोरिवलीमधील लोकांनी देखील बाहेर फिरायला जायचे असेल तर आता काश्मीरमध्ये फिरायला जा, असे अमित शहा म्हणाले. पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, कर्नाटकमध्ये वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात असे होणार नाही. पंतप्रधान मोदींनी यात सुधारणा केली आहे. वक्फ बोर्डमध्ये बदल होणार आहे. पुढे बोलताना शरद पवारांवर देखील टीका केली आहे. 10 वर्ष ते कॅबिनेट मंत्री होते, त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का नाही मिळवून दिला? काही हरकत नाही, पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अमित शहा म्हणाले, तुम्हाला नागपूरला जाताना विमानात बसायला भीती वाटत असेल तर आम्ही तयार केलेल्या समृद्धी महामार्गाने जा, लवकर पोहोचाल. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी केली, मी विचारतो उद्धव ठाकरे तुम्ही अजून किती लाचार होणार? कधी एकांतात बसून बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण करा. राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन संविधान दाखवत फिरत आहेत. एका सभेत संविधानावर भाषण त्यांनी दिले. नंतर त्यांनी संविधान संविधानांच्या प्रती वाटल्या, मात्र त्यात काहीच लिहिलेले नव्हते हे उघडकीस आले. राहुल गांधी जरा लाज वाटू द्या. संविधानाचा असा अपमान तुम्ही केला. तुम्हाला जरा जरी काही वाटत असेल तर चुल्लूभर पाण्यात बुडून जा, असे म्हणत अमित शहा यांनी टीका केली आहे.

Share

-