कळमनुरीसाठी ठाकरे गटाकडून चौघांनी दिल्या मुलाखती:दसऱ्यानंतर पुन्हा मुंबईत होणार बैठक

कळमनुरी विधानसभा मतदार संघातून शिवसेना उबाठा गटाकडून चौघांनी सोमवारी मुंबईत मुलाखती दिल्या आहेत. यावेळी खुद्द पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत. आता दसऱ्यानंतर पुन्हा एकदा बैठक होऊन उमेदवाराची घोषणा होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. कळमनुरी विधानसभेची जागा महाविकास आघाडीतून शिवसेना उबाठा गटाला सोडली जाणार असल्याचे निश्‍चित ्मानले जात आहे. त्यानुसार शिवसेनेच्या उबाठा गटाने तयारी सुरु केली असून त्यासाठी इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी देखील सुरु केल्या आहेत. या शिवाय विविध कार्यक्रमांनाही इच्छुक उमेदवारांकडून हजेरी लावली जाऊ लागली आहे. दरम्यान, आज मुंबई येथे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पक्षाचे नेते विनायक राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी इच्छुकांच्या मुलाखती देखील झाल्या. यावेळी माजी आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य अजित मगर, बाळासाहेब मगर यांनी मुलाखत देऊन उमेदवारी मागितली आहे. त्यानंतर ठाकरे यांनी जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख व शहप प्रमुखांशी वैयक्तिक चर्चा करून उमेदवारी बाबत त्यांचीही मते जाणून घेतली आहे. दरम्यान, आता दसरा महोत्सवानंतर पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार असून त्यानंतर उमेदवार जाहिर केला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी हिंगोलीची जागा शिवसेनेला सोडवून घ्यावी अशी मागणी लाऊन धरली. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीतच यावर निर्णय होणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. कळमनुरी विधानसभेतून उबाठा गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मात्र चौघे जण इच्छूक असल्यामुळे नेमकी कोणाची निवड करावी असा प्रश्‍न वरिष्ठ नेत्यांसमोर उभा राहिला आहे. पुढील काही दिवसांतच उमेदवाराचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Share

-