दुर्गा या असुरांचा नक्की संहार करतील:त्यांच्या आरोपांना कामाने उत्तर देऊ, मुख्यमंत्र्यांनी साधला विरोधकांवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प, छेडा नगर ते ठाणे पूर्वमुक्त मार्ग प्रकल्पाचे भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, डोंगराएवढी कामे उभी राहत असताना विरोधक रोज आरोप, शिव्याशाप देण्याशिवाय यांच्याकडे दुसरे काही नाही. आम्ही नेहमी सांगतो, तुमच्या आरोपांना आम्ही आरोपाने नाही कामातून उत्तर देऊ आणि माझ्या समोर बसलेल्या या साक्षात दुर्गा या असुरांचा नक्की संहार करतील, यात माझ्या मनात शंका नाही, अशी टीका त्यांनी केली.

महाविकास आघाडीवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाआघाडी सरकारच्या बालहट्टामुळे मुंबई मेट्रो 3 चे काम बंद पाडले होते. त्याची चौकशी लावा म्हणाले, पण मी काही चौकशी लावली नाही, नाहीतर हा कार्यकर्मच झाला नसता. त्यांचा आग्रह होता ही विकासकामे बंद करणे, अटल सेतु, समृद्धी, कोस्टल रोड, मेट्रो, कारशेड या संगळ्यामध्ये त्यांनी स्थगिती लावली. परंतु दोन वर्षांपूर्वी आम्ही यांचा टांगा पलटी केला आणि त्यामुळेच हे प्रकल्प पुढे जात आहेत. दरम्यान, वाशिम येथील पोहरादेवी येथे देखील पंतप्रधान मोदींचा दौरा पार पडला यावेळी ‘बंजारा विरासत’ या म्युझियमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे, मात्र विरोधक म्हणतात ही योजना बंद करू, परंतु कोणीही लाडकी बहीण योजना कधीच बंद करू शकणार नाही. कारण ही योजना गोरगरीब बहीणींसाठी आहे, असे ते म्हणाले.

Share

-