तुम्हाला माजी मंत्री, आमदार ओळखता येत नाही का?:गाडी अडवल्याने विजय शिवतारे पोलिसांवर संतापले, शिंदेंच्या भेटीसाठी झाले होते दाखल

महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार स्थापन करण्याची लगबग सुरू आहे. 5 तारखेला शपथविधी देखील पार पडणार आहे. या सगळ्यात शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आहेत. प्रकृती ठीक नसल्याने ते सध्या त्यांच्या निवासस्थानीच विश्रांती घेत आहेत. पक्षातील आमदार व नेते मंडळी त्यांची भेट घेत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आले होते. यावेळी गेटवरील पोलिसांनी त्यांना थांबवले. यामुळे शिवतारे संतापले असल्याचे समोर आले आहे. तुम्हाला माजी मंत्री, आमदार ओळखता येत नाही का? अशा शब्दात विजय शिवतारे यांनी पोलिसांना सुनावले आहे. विजय शिवतारे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ठाणे येथील निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांची गाडी गेटवरच अडवली. गाडी अडवल्यामुळे विजय शिवतारे चांगलेच संतापले. पोलिसांना बोलताना ते म्हणाले, किती वर्ष झाले तुम्हाला इथे आहात? तुम्हाला माजी मंत्री, आमदार ओळखता येत नाहीत का? अशा शब्दात शिवतारे यांनी पोलिसांना सुनावले. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर विजय शिवतारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. विजय शिवतारे म्हणाले, मी छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो. त्यानंतर आज मुंबईत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि भेटण्यासाठी आलो होतो. एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक आहे. पण आजच्या दिवस त्यांना आराम करावा लागेल. तसेच आज कोणत्याही बैठका नव्हत्या. मला आता एकाने सांगितले की, अशा बातम्या सुरु आहेत की बैठक बोलावली होती. पण कोणतीही बैठक बोलावली नव्हती. खाते वाटपासंदर्भातील सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळे ते जे ठरवतील ते सर्वांना मान्य असेल, अशी प्रतिक्रिया शिवतारे यांनी दिली आहे.

Share