पक्षात बेईमानी करणारे मतदार संघाचे काय भले करणार:माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची कडाडून टीका

गावात गावात लहान मोठ्या निवडणुकांमधून त्रास देणारे तसेच पक्षात बेईमानी करणारे मतदार संघाचे काय भले करणार असा आरोप करीत सरपंच पदापासून ते आमदारपदापर्यंत नेल्यानंतरही विकास कामे झालीच नाहीत अशी टिका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार तथा माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी विरोधकांवर वसमत येथे प्राचारात केली आहे. वसमत विधानसभा मतदार संघाकडे संपूर्ण मराठवाडयाचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे (शरदपवार गट) माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, तर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे विद्यमान आमदार राजेश नवघरे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. दांडेगावकर हे आमदार नवघरे यांचे राजकीय गुरु असल्याचे मानले जाते. दांडेगावकर यांनी सन 2019 मधील विधानसभा निवडणुकीत माघार घेऊन नवघरेेंना उमेदवारी दिली होती. मात्र यावेळी दोघेही आमने सामने उभे आहेत. दरम्यान निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जाऊ लागले आहेत. वसमत येथे नुुकत्याच झालेल्या सभेत दांडेगावकर यांनी आमदार नवघरे यांचे नांव न घेता कडाडून टिका केली. सरपंच पदापासून आमदार केले पण विकास कामे झाली नाहीत. बंधाऱ्याची प्रशासकिय मान्यता 50 लाखांची असतांना सुधारित प्रशासकिय मान्यता दिड कोटी रुपयांपर्यंत नेल्याचा आरोप त्यांनी केला. वसमत शहरात तीन कोटी रुपयांच्या खर्चामध्ये संपूर्ण पथदिवे बदलता येतात मात्र त्यावर 15 कोटींचा खर्च केला. लाईट लावले पण विज नाही असे त्यांनी सांगितले. एका गावात शेतकऱ्यांनी रस्ता तयार केला मात्र त्याचे देयक उचलून घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर मागील दोन महिन्यात विधानसभा मतदार संघात दहा फुटाच्या रस्त्यासाठी नारळ फोडून त्याचे व्हॉटसअपवर छायाचित्र अपलोड केले मात्र कामाचा पत्ता नसल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभा मतदार संघात कंत्राटदार उध्वस्त झाले, लहानमोठे ट्रॅक्टर चालविणारे उध्वस्त झाले. गावात वाद उभे राहिले, आरामशीनवाले उध्वस्त झाले आहे. बदलाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या योजना जनते पर्यंत पोहोचत नसतील तर आमदाराचा काय उपयोग अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, राजकीय गुरुंनी केलेल्या टिकेला आता राजकीय शिष्य असलेले आमदार नवघरे काय उत्तर देणार याची उत्सूकता मतदारांना लागली आहे. तर या संदर्भात आमदार नवघरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांचे पीए असणारे शिंदे यांनी मोबाईल घेऊन आमदारांना माहिती देतो असे सांगितले. तर सायंकाळी उशीरा पर्यंत त्यांनी मोबाईल घेतलाच नाही. त्यामुळे त्यांमुळेत त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Share

-