हिंगोली विधानसभेतील जनता आपल्या पाठीशी:अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांचा दावा
हिंगोली विधानसभा निवडणुक जनतेच्या हितासाठी तसेच विकासासाठी लढवित असून जनता आपल्या पाठीशी असल्याचा दावा अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी रविवारी ता. १७ पत्रकारांशी बोलतांना केला आहे. हिंगोली येथे रामदास पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मागील दोन दिवसांपासूून आपल्या बद्दल विरोधकांकडून विनाकारण अफवा पसरवली जात असून टिकेची पातळीही घसरली आहे. आपल्या व्यंगावर टिका केली जात आहे. त्यांचा पराभव समोर दिसत असल्याने त्यांची बौध्दीक दिवाळखोरी निघाली आहे. विकासावर जाणारी निवडणुक आता जातीवर आणण्यात आली असून जातीपातीमध्ये जनतेला मुर्ख बनविण्याचे काम विरोधकांकडून केले जात असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला आहे. हिंगोली विधानसभा निवडणुक विकास अन व्यापक ध्येयाने लढवित आहे. माझ्यावर विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. मात्र पैसाच माझ्यासाठी महत्वाचे असते तर नोकरी सोडून जनसेवेत दाखल झालोच नसतो असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावातून कार्यकर्ता माझ्यासाठी निवडणुकीच्या प्रचारात उतरला आहे. आता पर्यंत विधानसभा मतदार संघात दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून जनता आपल्या पाठीशी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणे तसेच माझ्या जातीवर, व्यंगावर टिका करण्यापेक्षा विरोधकांनी विकास कामांवर बोलले पाहिजे. माझी दोस्ती पाहिली आहे मात्र दुष्मनी पाहण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.