आदित्य ठाकरेंसाठी वरळीत ‘दे धक्का’ निकालाची चिन्हे:मनसे-उद्धवसेनेत मराठी मतांची विभागणी शिंदेसेनेच्या पथ्यावर पडू शकते

वरळी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंच्या पराभवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय चक्रव्यूह रचला आहे. राज यांनी संदीप देशपांडे या मराठी कार्यकर्त्याला मैदानात उतरवले आहे, तर शिंदेंनी राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरांना विधानसभेचेही तिकीट दिले आहे. येथे मराठी मतांची संख्या किमान ४५ टक्के आहे. इतर भाषिक हिंदुत्ववादी मते १० ते १५ टक्के आहेत. मुस्लिमांची ९.२ टक्के एकगठ्ठा मते मिळाली तरी आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंमध्ये मराठी मतांची विभागणी अटळ आहे. म्हणून वरळीत आदित्य यांच्यासाठी ‘दे धक्का’ निकाल लागण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकसभेला वरळीत मविआला फक्त ६७१५ मतांची आघाडी मिळाली होती ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. २०१९ नंतर आदित्य ५ वर्षे वरळीतील मतदारांच्या संपर्काबाहेर होते. त्याविषयीही नाराजी आहेच. पाच वर्षे आदित्य संपर्काबाहेर असल्याचीही तक्रार शिवसेनाप्रमुखांचे नातू, तरुण चेहरा आणि माजी कॅबिनेट मंत्री तसेच पर्यावरणप्रेमी म्हणून आदित्य ठाकरे वरळीकरांमध्ये लोकप्रिय आहेत. परंतु, एकदा निवडून आल्यावर नॉट रिचेबल होणे, स्थानिक लोकांशी थेट संपर्क नसणे ही त्यांची सर्वात मोठी कमजोरीही आहे. २०१९ मध्ये राज ठाकरेंनी वरळीत त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नव्हता. मात्र, यंदा मनसेचे संदीप देशपांडे आहेत. दुसरीकडे शिंदेसेनेचे मिलिंद देवरा आहेत. त्यांनी अमराठी भाषिकांची बऱ्यापैकी मते मिळतील. शिवाय शिंदेंनी ताकद पणाला लावली तर देवरा मराठी मतेही मिळवतील असे दिसत आहे.
राज फॅक्टर परिणामकारक सर्वात महत्त्वाची बाब समोर आली आहे ती म्हणजे वरळीत या वेळी मतदानाच्या पद्धतीत बदल होण्याची चिन्हे आहेत. २०१९ मध्ये हिंदी भाषिक आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होते. मात्र, या वेळी ही व्होट बँक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विभागली गेली आहे. राज ठाकरे आणि मनसेवर विश्वास ठेवणारा मतदार गेल्या वेळी आदित्य ठाकरेंसोबत एका खास कारणासाठी होता, तो या वेळी त्यांच्या पाठीशी उभा राहताना दिसत नाही.

Share

-