आता सोयाबीन, कापसाला भाव अन् नुकसान भरपाई मिळते का?:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर हल्लाबोल

आमचे (मविआ) सरकार असताना सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळत होता. शेतीच्या नुकसानीची भरपाईही वेळेवर मिळत होती. आता असे होते का, असे विचारताच नागरिकांनी नकाराचा सूर आवळत त्या सरकारात मिळत होते, याला हात उंचावून होकारार्थी ‌उत्तर दिले. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि. ७) वलगाव, दर्यापूर आणि बडनेरा येथे मविआ उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. तिवसा मतदारसंघातील यशोमती ठाकूर, दर्यापूर गजानन लवटे, अमरावती डॉ. सुनील देशमुख आणि बडनेराचे उमेदवार सुनील खराटे यांच्या प्रचारार्थ या सभा आयोजित केल्या होत्या. उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या राज्यात व देशात खोट्यांची सरकारे आहेत. जे सांगायचे ते करायचेच नाही, अशी लबाडी सुरू आहे. महाराष्ट्रात तर जणू चोर बाजारच भरला आहे. वडील चोरले, पक्ष चोरला, निशाणी चोरली…अशी एकूण स्थिती आहे. त्यामुळे यांना बाजूला फेकण्यासाठी मला तुमचा कौल हवा आहे. लोकसभेत तो तुम्ही मला दिला. आता विधानसभेतही तसाच कौल द्या आणि महाविकास आघाडीने जो वचननामा तुमच्यासमोर ठेवला आहे, त्या पद्धतीने आमच्याकडून कामे करून घ्या. मी आधी करून दाखवले, त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहे, हेही त्यांनी सांगितले. सध्याचे राज्यकर्ते संत गाडगेबाबांची दशसूत्री विसरले : सध्याचे राज्यकर्ते संत गाडगेबाबांची दशसूत्री विसरल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे यापुढे यांचे ऐकाल तर देश संपला म्हणून समजा, हा भविष्यातील धोकाही अधोरेखित केला. राणा दाम्पत्याबद्दल शब्दही उच्चारला नसल्याने आश्चर्य उद्धव ठाकरे यांची सभा बडनेरा येथे होत असल्याने ते तेथील महायुतीचे उमेदवार रवी राणा किंवा माजी खासदार नवनीत राणा यांच्याबाबत काहीतरी बोलतील, अशी चर्चा सभेपूर्वी होती. मात्र ठाकरे यांनी राणा दाम्पत्याबद्दल शब्दही उच्चारला नाही. राणा दाम्पत्याने तीन वर्षांपूर्वी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट पूर्ण करत राज्यात खळबळ उडवून दिली होती, त्यामुळे नागरिकांना असे वाटत होते. परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला, अशी चर्चा सभा संपल्यानंतर ऐकायला मिळाली.

Share

-