राज्यात दीड कोटी आणि विदर्भात 25 लाख लोकसंख्या:भाजपने दुर्लक्ष केल्यास माळी समाज बिघडवू शकतो सत्तेचे गणित

माळी समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात सुमारे दीड कोटी आहे. इतर प्रांतात 8 ते 10 कोटी व पूर्ण भारतात एकूण माळी समाजाची संख्या 10 ते 15 कोटी असावी. आज महाराष्ट्रात माळी समाजाची संख्या तीन नंबरवर आहे. एकेकाळी 19-20 आमदार निवडून यायचे आता 5 ते 7 च्या वर आपले विधानसभा सदस्य नसतात. हे लक्षात घेता माळी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अ. भा. माळी महासंघाचे विश्वस्त गोविंद वैराळे यांनी केली आहे. राज्यात किमान 20 ते 25 आणि विदर्भात 4 ते 5 जागी माळी समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी वैराळे यांनी केली आहे. भाजपकडून समाजाला जास्त अपेक्षा माळी समाजाला डावलण्यात आले तर गंभीर परिणाम राजकीय पक्षाला भोगावे लागतील, असा इशारा गोविंद वैराळे यांच्यासह मधुसुदन देशमुख, माळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष मुकुंद पोटदुखे, जिरे माळी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र वाठ आदींनी दिला आहे. माळी समाजाचे उमेद्वार आणि कार्यकर्ते हे राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीमध्ये जास्त असल्याने व गेल्या दोन दशकांपासून माळी समाजाचे मत हे भाजपला जात असल्याने भाजपकडून समाजाला जास्त अपेक्षा आहे, असे वैराळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात 35 जिल्हे आहेत. माळी समाज हा ग्रामीण भागात जास्त वसलेला असल्याने कोकण विभाग आणि मुंबई उपनगरचे 6 जिल्हे ज्यांची लोकसंख्या 2011 च्या सेन्सस प्रमाणे 2.5 करोड आहे. यात माळी समाजाची संख्या अगदीच नगण्य आहे. उर्वरित महाराष्ट्राची लोकसंख्या 8.5 करोड आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातले 5 जिल्हे, मराठवाड्यातील 8 जिल्हे, आणि विदर्भातील 11 जिल्हे यात विभागली आहे. यातही नंदुरबार, नांदेड, हिंगोली, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, वर्धा, यवतमाळ व लातूर या 9 जिल्ह्यांमध्ये माळी समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 5 टक्क्यांपेक्षा जास्त नाही. नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशीम, सातारा, बीड, जालना, संभाजीनगर, परभणी, धाराशिव व धुळे या 11 जिल्ह्यांमध्ये एकूण लोकसंख्येच्या 8 ते 12 टक्के पर्यंत कमी अधिक प्रमाणात आढळून येतो. त्यातही ग्रामीण भागात प्रमाण जास्त आहे . अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, जळगाव, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, पुणे या 9 जिल्ह्यांमध्ये एकूण लोकसंख्येच्या 15 ते 20 टक्केच्या प्रमाणात माळी समाज आढळून येतो. 12 टक्के वरील लोकसंख्या असलेला आकडा निवडणूक जिंकण्याकरीता सोयीचा आहे.

Share

-