ट्रम्प यांच्या हत्येच्या तिसऱ्या कटाचा खुलासा:’इराणी एसेट’वर हत्येचा कट रचल्याचा आरोप; गेल्या सहा महिन्यांतील चौथा कट
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंपर विजयाची नोंद करणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा आणखी एक कट उघड झाला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने या प्रकरणात फरहाद शकेरी नावाच्या इराणी नागरिकाला आरोपी केले आहे. एफबीआयच्या म्हणण्यानुसार, फरहाद शकेरी हा ‘इराणी एसेट’ आहे आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चा सदस्य आहे. 7 ऑक्टोबर रोजी फरहादला इराण सरकारने ट्रम्प यांच्या हत्येची योजना बनवण्याची जबाबदारी सोपवली होती. एफबीआयचे म्हणणे आहे की आयआरजीसीने यासाठी मुदतही निश्चित केली होती. यूएस ॲटर्नी जनरल मेरिक बी गारलँड म्हणतात, “न्याय विभागाने इराणच्या एका सरकारी एसेटला अटक केली आहे ज्याला ट्रम्पसह अनेक अमेरिकन नेत्यांची हत्या करण्यासाठी गुन्हेगारी नेटवर्क चालवण्याचे काम देण्यात आले होते.” एफबीआयचे संचालक ख्रिस्तोफर रे म्हणतात की, इराण सातत्याने अमेरिकन नागरिक, नेते आणि सरकारी अधिकारी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. IRGC ने गुन्हेगारांसोबत आमच्या लोकांवर हल्ला करण्याचा कट रचला आहे आणि हे खपवून घेतले जाणार नाही. अमेरिकेने IRGC ला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. दुसरीकडे, इराणने ट्रम्प यांच्या हत्येच्या कटाचे हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बगई म्हणाले, “इराण सध्याच्या किंवा माजी अमेरिकन अधिकाऱ्याला लक्ष्य केल्याचा आरोप ठामपणे नाकारतो.” ‘इराणी एसेट शकेरी’ कोण आहे? मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहाद शकेरी लहानपणी अमेरिकेत आला होता आणि 2008 मध्ये एका दरोड्याच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्याला हद्दपार करण्यात आले होते. सध्या तो इराणमध्ये आहे. याशिवाय न्यूयॉर्कमध्ये इराणी सरकारला विरोध करणाऱ्या एका इराणी नागरिकाची हत्या केल्याचाही आरोप शकेरीवर आहे. 2019 मध्ये, शकेरीला हेरॉइन तस्करीच्या आरोपाखाली श्रीलंकेत ताब्यात घेण्यात आले. शकेरीवर अनेक दहशतवादी संघटनांना मदत केल्याचाही आरोप आहे. ट्रम्प यांची सुरक्षा हे कठीण आव्हान आहे गेल्या 6 महिन्यांत ट्रम्प यांच्यावर दोन जीवघेणे हल्ले झाले आहेत. जुलैमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पेनसिल्व्हेनिया येथील रॅलीतही ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोळी त्यांच्या कानाला लागली होती. ज्या व्यक्तीने गोळी झाडली तो जागीच ठार झाला. दोन दिवसांनंतर, 16 जुलै रोजी, अमेरिकेतील मिलवॉकी शहरात रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनाबाहेर पोलिसांनी एका 21 वर्षीय व्यक्तीला एके-47 सह अटक केली. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनंतर त्यांच्यावर दुसरा जीवघेणा हल्ला झाला. यातही ट्रम्प यांचा जीव थोडक्यात बचावला. आरोपीला अटक करण्यात आली. अशा स्थितीत त्यांच्याविरुद्धचा हा तिसरा मोठा कट उघडकीस आल्यानंतर ट्रम्प यांची सुरक्षा अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसचे पहिले प्राधान्य बनले आहे. फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांच्या घरी गस्त घालण्यासाठी रोबोटिक कुत्र्यांचा वापर केला जात आहे.