थोरातांचा 1 फोन अन् गोळ्या घालण्याचे आदेश:संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; बिबट्याला ठार मारा, वनमंत्र्यांचे आदेश

बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज रास्ता रोको केला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ही बाब वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून देत या प्रकरणी तत्काळ कारवाईची मागणी केली. त्यावर मुनगंटीवार यांनी सदर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले. तसेच नागरिकांच्या तक्रारीची दाखल न घेणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही ग्वाही दिली. यासंबंधीच्या वृत्तानुसार, संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे शुक्रवारी सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात योगिता पानसरे नामक महिलेचा बळी गेला. या बिबट्याच्या हल्ल्यात गत 2-3 महिन्यांत या भागातील 3 ते 4 जण ठार झालेत. त्यामुळे येथील नागरिकांनी त्याची वनविभागाकडे तक्रार केली. पण त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. अखेर आज विजयादशमीच्या दिवशीच या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात आंदोलक विशेषतः महिला आंदोलक आपली गाऱ्हाणी मांडत होत्या. बिबट्या महत्त्वाचा की माणसे याचा विचार आता सरकारने केला पाहिजे. सरकारला बिबटे महत्त्वाचे वाटत असतील तर आम्हा माणसांना मारून टाका. सरकार बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून पैसे देते. पण आम्हाला पैसे नको. सुरक्षा हवी आहे. सरकार सुरक्षा देणार नसेल तर माणसांसाठीच एखादे अभयारण्य निर्माण करा, अशी संतप्त भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. थोरातांनी थेट वनमंत्र्यांना फोन लावला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कानावर या आंदोलनाची माहिती पडताच त्यांनी तत्काल घटनास्थळ गाठले. त्यांनी लोकांच्या तीव्र भावना समजून घेतल्या. त्यानंतर घटनास्थळावरूनच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला. त्यांनी त्यांच्यासोबतचे भाषण स्पीकरवरून उपस्थितांनाही ऐकवले. यावेळी वनमंत्र्यांशी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, आज दसऱ्याचा सण असूनही 4 ते 5 हजार लोक रस्त्यावर उतरलेत. त्यांच्या भावना संतप्त आहेत. माणसांवर हल्ला करणारा बिबट्या नरभक्षक झाला आहे. त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत. अजूनही जवळपास 15 – 20 बिबटे या भागात फिरत आहेत. त्यांचाही बंदोबस्त करण्याची गरज आहे. वनविभागाचे लोक पिंजरे लावतात. पण बिबटे त्यात अडकत नाहीत. अधिकारी येथील लोकांचे फोन घेत नाहीत. मग नागरिकांनी तक्रारी कुणाकडे करायच्या? असा सवाल थोरात यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना केला. तसेच तक्रारी न ऐकणाऱ्या वनविभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी केली. वनमंत्र्यांचे बिबट्याला ठार मारण्याचे आदेश त्यानंतर मुनगंटीवार यांनी हल्लेखोर नरभक्षक बिबट्याला तत्काळ ठार मारण्याचे आदेश दिले. ते आंदोलकांशी संवाद साधताना म्हणाले, आज दसऱ्याची सुट्टी असली तरी मी त्या नरभक्षक बिबट्याला तत्काळ ठार मारण्याचे आदेश देत आहे. नागरिकांनी त्यांच्या भागात असणारे इतर बिबटे पकडण्यासाठी वनखात्याला सहकार्य करावे. विशेषतः वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही तत्काळ तिथे जाऊन परिसरातील सर्व बिबट्यांना पकडण्याची कारवाई करावी. दरम्यान, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशांनंतरही आंदोलकांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. पण बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या समजूत घातल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

Share