भाजपचे दोन मोठ्या नेत्यांचे मुले शिवसेनेच्या वाटेवर?:नारायण राणे आणि धनंजय महाडिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

आगामी विधानसभा निवडणुक अगदी काही दिवसांवर आली असून राजकीय पक्षांकडून आता उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहेत. यात आता भाजपचे दोन मोठ्या नेत्यांची मुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी शिवसेना पक्षात प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपचे नेते व खासदार नारायण राणे व राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आहे. नारायण राणे यांचे पुत्र व रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे नीलेश राणे आता शिवसेनेच्या धनुष्यबाण हाती घेत निवडणुकीच्या मैदानात उतरणार का, अशी चर्चा सुरू आहे. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र हा मतदारसंघ देखील शिवसेना शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे धनंजय महाडिक यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचे समजते. त्यामुळे कृष्णराज महाडिक हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, कोल्हापूर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. पाचवेळा या मतदारसंघात शिवसेनेने भगवा फडकवला आहे. मात्र आता 2022 साली झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशा लढतीत भाजपने थेट 80 हजार मते घेतल्याने आता या जागेवर भाजप देखील आपला दावा सांगत आहे. यात आता महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.

Share