दोन दिवसापूर्वी केलेला आरोप खरा ठरला:शहरी नक्षलवाद्यांना इशारा देण्यासाठीच लाल पुस्तकाचा वापर, देवेंद्र फडणवीसांचा दावा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी दोन दिवसापूर्वी राहुल गांधींवर केलेला आरोप खरा ठरला आहे. नागपुरात एकूणच भारताच्या संविधनाबद्दल राहुल गांधींची अनास्था पाहायला मिळाली. लाल पुस्तक घेवून त्यांना संविधानाचा गौरव करायचा नाही. तर त्यांच्यासोबत असलेले शहरी नक्षलवादी आणि अराजकतावादी यांना एक प्रकारे इशारा देण्यासाठी तसेच त्यांची मदत घेण्यासाठी हे नाटक केले आहे. पण त्यांच्या या नाटकाला आता आंबेडकरी जनताही भूलणार नाही. राहुल गांधी संविधानाचा रोज अपमान करीत आहे. त्यांनी आंबेडकर व संविधानाचा अपमान केला. त्यांच्या अवती भोवती अराजकता पसरवणारे लोक असल्याचा मोठा दावाही फडणवीस यांनी केला आहे. भारत जोडो हा समूह तयार करण्यात आला आहे. या समूहामध्ये अनेक संघटना अतिशय डाव्या विचारांच्या आहेत. त्यांच्या कामाची पद्धत, ध्येय धोरणे ही अराजक पसरवणारी यंत्रणा आहे. एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधानच का? लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देताय? असा सवाल फडणवीसांनी बुधवारी केला होता. संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात, असे देवेंद्र फडणवीस बुधवारी म्हणाले होते. संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्यांना एकत्र करून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. अर्बन नक्षलवादाचा हा प्रयत्न आहे. अर्बन नक्षलवादाचा हाच अर्थ आहे की लोकांची मने कलुषित करायची. जेणेकरून देशातील संस्था, यंत्रणा यावरून त्यांचा विश्वास उडेल. यामुळे देशाच्या एकतेला आणि एकात्मकतेला धोका निर्माण होईल, अशी टीकाही फडणवीसांनी केली होती.