उद्धव ठाकरे यांना थोडी लाज वाटत नाही का?:व्होट जिहादच्या मुद्यावरुन विश्व हिंदू परिषदेचा संतप्त सवाल; हिंदू समाजाने लक्ष देण्याची मागणी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असून देखील उद्धव ठाकरे यांना या सर्व गोष्टींची थोडी लाज वाटत नाही का? असा संतप्त सवाल विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रांत महामंत्री गोविंद शेंडे यांनी उपस्थित केला आहे. मौलाना सज्जात नोमाणी यांच्या विरोधात व्होट जिहादच्या वक्तव्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आता जनाब म्हटले जाते, यापेक्षा जास्त लज्जास्पद गोष्ट काय असू शकते? असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेने उपस्थित केला. यावरून उद्धव ठाकरे तुम्हाला लाज वाटते की नाही, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जे उभे केले, त्याच्यावर उद्धव ठाकरे पाणी फिरवत आहेत. हिंदू समाज या सर्व गोष्टींकडे पाहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सज्जात नोमाणी यांचे वक्तव्य आणि त्यांचे आवाहन हे देशाच्या ऐकण्यासाठी अत्यंत घातक असल्याचे ते म्हणाले. नोमाणी यांनी निवडणुकीच्या काळात मुद्दामहून असले असे वक्तव्य केले असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने व्होट जिहादाचा वापर केला. त्यामुळेच व्होट जिहादचा उल्लेख केल्यानंतर त्यांना मिरची लागत असल्याचे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिम समाजाचा बहिष्कार करा, हे वक्तव्य लोकशाहीची खिल्लाी उडवणारे असल्याचा आरोप त्यांनी केला. हा लोकशाहीचा अपमान असून निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यावे. तसेच हिंदू समाजाने देखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुस्लिम मत मिळवण्यासाठी अतिशय खालच्या स्तरावर हे राजकारण केले जात असल्याचा आरोप गोविंद शेंडे यांनी केला आहे. उलेमा बोर्डाच्या वतीने 17 मागण्याचा पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले आहे. या पत्राचा अर्थ काय होतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Share