अमरावतीत राहुल गांधींच्या सामानाची तपासणी:EC च्या अधिकाऱ्यांनी केली पडताळणी; उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे आक्षेप
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अमरावती येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सामानाची झाडाझडती घेतली. महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्याच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे राजकारण तापले आहे. राहुल गांधी यांची शनिवारी अमरावतीत प्रचारसभा झाली. तत्पूर्वी त्यांचे हेलिकॉप्टर येथील हेलिपॅडवर उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेऊन त्यांचे हेलिकॉप्टर व सामानाच्या बॅगांची कसून तपासणी केली. त्यांनी या संपूर्ण घटनाक्रमाची व्हिडिओग्राफीही केली. राहुल यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना याकामी मदत केली. यावेळी राहुल गांधी काही क्षण हेलिकॉप्टरजवळ थांबले. पण त्यानंतर ते तेथून आपल्या सभास्थानाकडे निघाले. यावेळी ते आपल्या सहकाऱ्यांना काही सूचना करतानाही दिसून आले. उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे आक्षेप उल्लेखनीय बाब म्हणजे यवतमाळच्या वणी मतदारसंघात गत सोमवारी उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक तथा आमदार मिलिंद नार्वेकर होते. यावेळी या दोघांच्याही सामानाची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. यावर उद्धव ठाकरे चांगलेच नाराज झाले होते. त्यांनी यासंबंधी आयोगाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक शब्दांत जाब विचारला होता. तसेच या घटनाक्रमाची स्वतः व्हिडिओग्राफी करून तो व्हिडिओही शेअर केला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी औसा येथील सभेला जातानाही उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी श्रीगोंदा येथील सभेपूर्वीही त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओही त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला होता. त्यानंतर सभेत या घटनेचा दाखला देत निवडणूक आयोगाने आपली बॅग ऑटो चेकिंग मोडवर टाकल्याचा आरोप केला होता. सर्वच नेत्यांच्या बॅगांची तपासणी दरम्यान, निवडणूक आयोगाने या निवडणुकीत उद्धव ठाकरे व राहुल गांधीच नव्हे तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. अमित शहा यांच्या बॅगांची कालच हिंगोलीत तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत ही प्रक्रिया निकोप व निष्पक्ष निवडणुकीसाठी आवश्यक असल्याचे म्हटले होते. हे ही वाचा… उद्धव ठाकरेंची बॅग अधिकाऱ्यांनी तपासली:वणी येथे हेलिकॉप्टरमध्ये जाऊन घेतली झाडाझडती; ठाकरेंनी पोस्ट केलेला VIDEO व्हायरल यवतमाळ – विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्राचे वातावरण तापले असताना आता अधिकाऱ्यांनी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची झाडाझडती घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात ते बॅगांची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझ्यासारख्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅगा तपासण्याचेही आव्हान दिले. वाचा सविस्तर तपासणीसाठी गाडी अडवून कर्मचारी गायब झाल्याने उद्धव ठाकरे संतापले:गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करतानाचा प्रकार मुंबई – गेले दोन दिवस हेलिकाॅप्टरमधील बॅगांची तपासणी केल्यामुळे उद्धव ठाकरे संतापले होते. बुधवारी महाराष्ट्र – गोवा सीमेवर त्यांची गाडी तपासणीसाठी अडवून अधिकारी गायब झाल्याने त्यांनी आणखीनच थयथयाट केला. वाचा सविस्तर