साक्री-शिर्डी मार्गावर दुचाकी-पिकअपच्या अपघातात मामाचा मृत्यू:भाचा गंभीर जखमी, मृतदेह घेण्यास नातेवाइकांचा नकार, भरपाईची मागणी
साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर यशवंतनगर येथे पिकअप व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात मामाचा जागीच मृत्यू झाला तर भाचा गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. १८) घडली. या महामार्गाचे काम घेतलेल्या बी. आर. गोयल कंपनीच्या पिकअपने दुचाकीला धडक दिली असून या वाहनाचा इन्सुरन्स नसल्याने नातेवाइकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. खामखेडा, ता. देवळा येथील केदा देवचंद सोनवणे (४०) व त्यांचा भाचा सागर दादाजी पिंपळसे (२०) हे ताहाराबाद येथून सटाण्याकडे दुचाकीने (एमएच ४१ बीएन ९३३७) येत होते. पिकअप (एमएच ४१ एयू ६५९६) व दुचाकीच्या झालेल्या अपघातात केदा सोनवणे यांचा मृत्यू झाला. पिकअपचालकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अपघाताची जबाबदारी कंपनीची असुन खामखड्याचे सरपंच वैभव पवार यांच्यासह नातेवाइकांनी भरपाईसाठी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या दिला. मात्र, काहीही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे मृतदेह घेण्यास नकार दिला. मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला.