मनपाच्या पुढाकाराने २०० महिला स्वयंपूर्ण:महिला व बालकल्याण विभागाच्या उपक्रमाने गरजू, विधवांना दिला आधार
मनपाच्या महिला व बालकल्याण विभागाने शहराच्या विविध भागातील २०० हून अधिक गरजू, निराधार, विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आधार दिला आहे. तसेच काही महिलांनी स्वयंरोजगार सुरू केला आहे. या महिला शहरातील विविध संस्था, प्रतिष्ठाने, रुग्णालयांमध्ये नोकरी करत असून, त्यांच्यापासून इतरही विधवा, परित्यक्ता महिलांना प्रेरणा मिळाली आहे. मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनात गरजू महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. अचानक काही महिलांच्या डोक्यावर आभाळ कोसळले. काहींना कोणताही आधार नसल्याने आर्थिक चणचण सहन करावी लागली. अशा महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी महिला व बालविकास विभाग सतत प्रयत्नरत आहे. याअंतर्गत गरजू, परित्यक्ता, विधवा महिलांकडून अर्ज मागवले जातात. याअंतर्गत शेकडो अर्ज मनपाकडे येत असतात. यापैकी पात्र महिलांना त्यांच्या आवडीनुसार व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले. काही महिलांना नि:शुल्क शिवणयंत्रे देण्यात आली. ज्यांच्या घरी जागा होती त्यांनी घरीच व्यवसाय थाटले. अजूनही मागणीनुसार शिवणयंत्रांचे वाटप सुरू आहे. ज्या महिलांना स्वत:चा लहान व्यवसाय थाटण्याची इच्छा होती, त्यांना ५० हजार रुपयांचे भांडवल उभारून देण्याची जबाबदारी महिला व बाल कल्याण विभागाने घेतली. यापैकी १२ हजार ५०० रुपये मनपाने दिले. प्रशिक्षणाअंती होमगार्ड, मदतनीस, सुरक्षा रक्षक बनल्या महिला ज्यांना व्यवसाय करायचा नव्हता, ज्यांच्याकडे स्वत:ची जागाही नव्हती, अशा महिलांना प्रशिक्षण दिल्यानंतर नोकरी मिळवून देण्यात आली. यापैकी काही महिला सुरक्षा रक्षक, काही होमगार्ड, काही खासगी रुग्णालयात मदतनीस, काहींना मॉल्स, शो रूममध्ये नोकरी मिळवून देण्यात आली. त्यामुळे या महिला आता आत्मविश्वासाने जीवन जगत असून इतरांनाही रोजगार मिळवण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. गरजू महिलांना आधार देणे हाच उद्देश; पात्रतेनुसार नोकरीही मनपाच्या महिला व बालकल्याण विभागाचा शहरातील गरजू महिलांना रोजगार देणे हाच मुख्य उद्देश आहे. ज्या प्रारंभी स्वयंरोजगार उभा करू शकत नाहीत, ज्यांना बँकाही कर्ज देत नाहीत, ज्यांच्याकडे जागाही नाही अशा महिलांना नि:शुल्क प्रशिक्षण देऊन मॉल्स, खासगी रुग्णालये, शोरूम, कंपन्यांमध्ये त्यांची आवड व शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळवून देण्यात आली. -नरेंद्र वानखडे, उपायुक्त, मनपा.