बेरोजगार तरुण अचानक झाले कोट्यधीश:मालेगावातील 12 जणांच्या खात्यात 125 कोटींची उलाढाल, खातेदार मात्र अनभिज्ञ

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका बँकेच्या 12 खातेदारांच्या खात्यात 100 ते 125 कोटी रुपयांची उलाढाल झाला आहे. शहरातील बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून हा आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या खात्यावरुन व्यवहार होत आहेत, त्यांनाच याबाबत काहीही कल्पना नाही. अचानक खात्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांमुळे तरुणही गोंधळात पडले आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. मालेगावातील नाशिक मर्चंट बँकेच्या शाखेत 12 बेरोजगार तरुणांच्या खात्यावर 125 कोटी रुपये एवढ्या रकमेचे व्यवहार झाले आहेत. गेल्या 15-20 दिवसांत कोणाच्या खात्यावर 10 तर कोणाच्या खात्यावर 15 कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार करण्यात आले. बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचे आमिष दाखवत हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी सिराज अहमद या व्यक्तीने या बेरोजगार तरुणांना मालेगाव बाजार समितीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सह्या घेत नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेत बनावट खाती उघडली. यानंतर तरुणांच्या नावाने बनावट कंपन्या तयार करून या खात्यांवरून मागील दहा ते पंधरा दिवसांत 125 कोटी रुपयांची उलाढाल केल्याचे समोर आले आहे. हा संपूण प्रकार लक्षात आल्यानंतर 12 तरुणांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. शिवसेना पदाधिकारी व बेरोजगार तरुण यांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली आहे. हा व्यवहार कोणी केला? यामागे कोणाचा हात आहे? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिस आता काय कारवाई करणार आणि तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत, अवघ्या 15 दिवसांत 125 कोटी रुपयांचा खात्यातून मोठा आर्थिक व्यवहार होणे, विशेष म्हणजे, ज्यांच्या खात्यातून व्यवहार झालेत, त्यांनाच याची कल्पना नसणे म्हणजे यात काहीतरी गडबड असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

Share

-