स्वच्छतेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन, स्वच्छता अभियानाचा समारोप‎

मेहकर शहराची स्वच्छता राखणे हे केवळ नगर पालिकेचेच काम नसून त्यासाठी नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवणे महत्त्वाचे आहे. स्वच्छतेमुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडते. त्यामुळे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. स्वच्छता अभियान २.० अंतर्गत शहरात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत विविध भागांत नगर पालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेचे काम करण्यात आले. या अभियानाचा समारोप आणि उत्कृष्ट कार्य केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना बक्षीस वितरण सोहळा आज, दि. २ ऑक्टोबर रोजी नगर पालिकेत पार पडला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय रायमूलकर होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले की, केवळ नगर पालिकेनेच स्वच्छता करावी अशी धारणा नागरिकांनी ठेवू नये. प्रत्येकाने या कामात योगदान द्यावे. शहरातील अतिक्रमणे ही शहराच्या सौंदर्यात बाधा आणतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याकडेही लक्ष द्यावे, असा सूचक इशारा त्यांनी दिला. सफाई कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या स्वच्छता अभियानाचे आमदार रायमूलकर यांनी यावेळी कौतुक केले. हे माझे शहर आहे अशी भूमिका ठेवून सर्वांनी स्वच्छतेच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी प्रास्ताविकात पालिकेने राबवलेल्या स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जाधव व आमदार रायमूलकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. “एक झाड आईसाठी” या अभियानांतर्गत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्वांनी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, तहसीलदार नीलेश मडके, अजय पिंपरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप मेटांगळे, ठाणेदार शिंगटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र गाडेकर, शहरप्रमुख जयचंद बाठिया, माया मस्के, वैशाली सावजी, कविता दांदडे, रविराज रहाटे, नीरज रायमूलकर, भूषण घोडे, अख्तर चुडीवाले, तौफिक कुरेशी, हनीफ गवळी, मनोज जाधव, समाधान सास्ते, अक्का गायकवाड, अजय चैताणे, सुधीर सारोळकर, अजय मापारी, संजय गिरी, श्रीकृष्ण जयवाळ, गणेश डोंगरे, संतोष राणे, अनिल मुळे, विशाल शिरपूरकर, शेख जफर, बंडू जवंजाळ उपस्थित होते. उत्कृष्ट कार्य केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांसह उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर व इतर मान्यवर.

Share

-