यूटर्न:पक्षाच्या सांगण्यावरून भगवा दहशतवाद बोललो -शिंदे; पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही केले थेट कौतुक

भगवा दहशतवाद हा शब्द वापरणे चुकीचेच आहे. त्या वेळी भगवा दहशतवाद होत असल्याचे पक्षाने सांगितले होते. त्यानुसार मी तेव्हा दहशतवाद हा शब्द वापरला. पण हा शब्द का वापरला हे मला माहीत नाही, असे बोलायला नको होते. तो शब्द चुकीचाच असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा दहशतवादाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग सरकारमधील माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यूपीए-२ सरकारच्या काळात ‘भगवा दहशतवाद’ या शब्दावरून टीका केली होती. पण, आता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. यूट्यूबवरील पॉडकास्टमध्ये बोलताना ते म्हणाले की, मी तेव्हा तो शब्द वापरायला नको होता. दहशतवादाला लाल किंवा भगवा… असा कोणताही रंग नसतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. नरेंद्र मोदी तीन वेळा पंतप्रधान होतील, असे तुम्हाला वाटले होते का? या प्रश्नावर शिंदे म्हणाले, मोदी कठोर परिश्रम घेतात. हिमाचलच्या निवडणुकीत मी त्यांना जमिनीवर काम करताना पाहिले आहे. आम्ही यूपीए-२ सरकारमध्ये होतो तेव्हा आम्हाला वाटले नव्हते की, मोदी तीनदा पंतप्रधान होतील त्यांनी खूप मेहनत घेतली आहे, असेही शिंदेंनी सांगितले.

Share