वैजापूर तालुक्यातील केंद्रावर परिक्षेत सर्रास कॉप्या:एका परीक्षार्थीकडे आढळले गाईड; केंद्र संचालकासह 15 पर्यवेक्षकांवर कारवाई

वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय येथे इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा जीवशास्त्राचा पेपर सुरू असताना श्रीमती अश्विनी लाठकर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक) जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या भरारी पथकाने भेट दिली. यावेळी केंद्रावर मोठ्या प्रमाणात परीक्षा उपयोगी साहित्य, गाईड, स्पार्क गाईड, मायक्रो झेरॉक्स, नवनीत व इतर साहित्य इमारतीच्या बाजूस व एका विद्यार्थ्याकडे आढळून आले. यावेळी भरारी पथकाने संस्था अध्यक्ष व सचिव तसेच केंद्र संचालक व 15 पर्यवेक्षक यांच्यासह संबंधित विद्यार्थ्यावर कॉपी गैरमार्गप्रकरणी कारवाई केली आहे. फुलंब्री येथील पिंपळगाव वळण येथील प्रकरण ताजे असतानाच शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने आज वैजापूर येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय निमगाव येथे अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान पथकास इमारतीच्या आजूबाजूला परीक्षा दालनाबाहेर कॉपी तसेच परीक्षा उपयोगी साहित्य गाईड, मायक्रो झेरॉक्स इत्यादी गैरप्रकारातील साहित्य आढळून आले. पथकाने केंद्रात प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनाबाहेर कॉप्यांचा वर्षाव केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शाळेचे प्रशासन केंद्र संचालकासह 15 पर्यवेक्षक यांनी विद्यार्थी तपासणी अक्षम्य दुर्लक्ष केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली. तसेच जीवशास्त्राच्या पेपरसाठी नवनीत गाईड कॉपी म्हणून बाळगल्या प्रकरणी एका विद्यार्थ्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी संस्था अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालक पर्यवेक्षक यांच्यावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अध्यक्ष विभागीय शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार तात्काळ गुन्हा नोंदविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती वैजापूर) यांना श्रीमती अश्विनी लाठकर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर) यांनी आदेशित केले आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करून समिती अहवालातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर संस्था तसेच केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर म्हणाल्या, आज इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र विषयाच्या पेपरला कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय निमगाव तालुका वैजापूर येथे शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने भेट दिली असता या परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक पर्यवेक्षक तसेच अध्यक्ष व सचिव यांनी परीक्षा संचलन कर्तव्य सूचीमधील नमूद कर्तव्यात कसूर तसेच शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वैजापूर यांना संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची लेखी आदेश देण्यात आली आहे. याप्रकरणी एका विद्यार्थ्याबरोबर देखील कॉपी गैरमार्ग प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Share