वाल्मीक कराडला हायकोर्टाचा दिलासा:ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली, याचिकाकर्त्याला ठोठावला 20 हजारांचा दंड

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक असलेला धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशी करावी, अशा मागणीची याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र, हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. हायकोर्टाने याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना 20 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला. यामुळे हा वाल्मीक कराडसाठी दिलासा मानला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यास राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. याप्रकरणी 8 आरोपींना अटक केली असून सर्वांवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा खरा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. तसेच चौकशी दरम्यान वाल्मीक कराडकडे कोट्यवधीची संपत्ती असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे वाल्मीक कराडची ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. त्यातच वाल्मीक कराडविरोधात ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्याला ठोठावला 20 हजारांचा दंड
माहिती अधिकार कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी वाल्मीक कराडची ईडी चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. मात्र, हायकोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांना स्वैर याचिका दाखल केल्याबद्दल 20 हजारांचा दंड ठोठावला. तिरोडकर यांच्या वकिलांनी याचिका माघारी घेण्याचे मान्य केले. याचिकाकर्त्यांचा हेतू याचिकेतून स्पष्ट होत नसल्याने याचिका सुनावणीस योग्य नाही, असे मत मुख्य न्यायमूर्तींचा व्यक्त करत सुनावणीस नकार दिला. निवडणूक आयोगाला केले होते प्रतिवादी
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत सुरू करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. या प्रकरणात एका कॅबिनेट मंत्र्याचे नाव सातत्याने येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात अनेक मर्यादा येत असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला. या प्रकरणी मंत्री महोदयांशी संबंधित अनेक कंपन्या आणि मालमत्तासमोर येत असल्याने याचिकेत निवडणूक आयोगालाही प्रतिवादी करण्यात आले होते. वाल्मीक कराडचा कोठडीतील मुक्काम वाढला 22 जानेवारी रोजी वाल्मीक कराडला बीड विशेष न्यायालयाकडून 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. काल या कोठडीची मुदत संपली. त्यानंतर कराडला कोर्टात हजर न करताच त्याची न्यायालयीन कोठडी आणखी 14 दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे वाल्मीक कराडचा कोठडीतील मुक्काम 18 फेब्रुवारीपर्यंत वाढला आहे.

Share