वाट्टेल ते आरोप सहन केले, माझ्याजागेवर दुसरी आणली:हर्षवर्धन जाधवांवर गंभीर आरोप करत संजना जाधव भर सभेत ढसा-ढसा रडल्या

छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव यांनी प्रचार सभेत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. संजना जाधव या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. प्रचार सभेत बोलताना संजना जाधव यांनी पती हर्षवर्धन जाधव यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. लग्न झाल्यानंतर मी खूप काही सोसले प्रचार सभेत बोलताना संजना जाधव म्हणाल्या, हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर मी खूप काही सोसले. मी लग्न होऊन एका महिन्यात घरी आले. वडिलांना याबाबत सांगितले तर म्हणाले, तुला एक मूल होऊ दे, मूल झाल्यावर हा माणूस सुधारेल. मूल झाल्यावर माझे वडील म्हणाले, चाळिशी झाली की माणूस सुधरत असतो. चाळिशी झाली, जे सहन केले त्याचा मोबदला मला मिळाला नाही पण माझ्या जागेवर कोण आणले हे तुम्हाला माहिती आहे. हे बोलल्यावर संजना जाधव यांना स्टेजवरच रडू कोसळले. मुलीचा बाप होता म्हणून ते शांत बसले पुढे बोलताना संजना जाधव म्हणाल्या, माझ्या वडिलांवर वाटेल ते आरोप लावण्यात आले. परंतु, आम्ही सगळे सहन केले. करण एका लेकीच्या बापाने ते सहन करायचे असते. मुलाचा बाप असता तर रस्त्यावर उतरला असता. मुलीचा बाप होता म्हणून ते शांत बसले, असेही संजना जाधव म्हणाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आपले संस्कारच आहेत, आई म्हणाली होती, आता तू घरून जात आहे. तू परत येशील तेव्हा तिरडीच आली पाहिजे, तू एकटी नाही आली पाहिजे, असे मला आईने सांगितले होते. हे सांगताना संजना जाधव यांचा कंठ दाटून आल्याचे पाहायला मिळाले. आईने सांगीतल्याप्रमाणे मी संसार केला. पण मला काय मिळाले. मी आत्तापर्यंत कधीच रडले नाही. कधीच कुठल्या गोष्टीची वाच्यता केली नाही, हे गांव माझे म्हणून भरून आले. मी काय केले आणि काय केले नाही हे सगळ्यांना माहीत आहे, असे संजना जाधव म्हणाल्या. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Share

-