विनोद तावडेंनी फेटाळले पैसे वाटल्याचे आरोप:म्हणाले – मी 40 वर्षांपासून राजकारणात, कुणी काहीही आरोप केले तरी मला फरक पडत नाही

नालासोपारा येथील एका हॉटेलमध्ये भाजपचे नेते विनोद तावडे यांना पैसे वाटत असताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीचे नेते व उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. तसेच यावेळी हॉटेलमध्ये भाजपचे उमेदवार राजन नाईक हे देखील उपस्थित होते. क्षितिज नाईक यांनी जेव्हा हॉटेलचा तपास केला तेव्हा अनेक खोल्यांमधून लाखांच्या घरात पैसे सापडत होते. यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्या सांगण्यानुसार विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विनोद तावडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच पत्रकार परिषद मध्येच थांबवण्यात आली, यावेळी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद थांबवण्यास सांगितल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. विनोद तावडे यांच्याकडील डायरीमध्ये लाखोंच्या संख्येत प्रत्येकाला पैसे वाटल्याचे नमूद करण्यात आले असल्याचे ठाकूर यांनी दाखवले. तसेच हॉटेलच्या एकाच खोलीतून जवळपास 9 लाख रुपये सापडले होते. विनोद तावडे यांना रंगेहाथ पकडल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये विनोद तावडे यांना घेरले होते. त्यानंतर हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर यांनी हे पैसे कोणाला वाटले असा सवाल करत विनोद तावडे यांना घेरले होते. येथील उमेदवार राजन नाईक यांनी विनोद तावडे यांना मतदानाचा टक्का कसा वाढवला जाईल यासाठी बैठकीला बोलावले असल्याचे सांगितले आहे. मात्र हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे सापडले असल्याने नेमका प्रकार काय आहे, याबद्दल अजूनही लोकांमध्ये संभ्रम असल्याचे दिसत आहे. पत्रकार परिषदेत देखील विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले नाही. आता यावर पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. विनोद तावडे म्हणाले, या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मी येत असताना इथे बैठक सुरू होती की निवडणूक दिवशी काय असते त्यावर बोलणं सुरू होते. यावेळी सगळ्यांना भेटलो आणि निघणार होतो. तेवढ्यात बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आले आणि त्यांना वाटले की पैसे वाटप सुरू आहे. निवडणूक आयोगाने माझी गाडी तपासली, माझी रूम तपासली आणि मी 40 वर्ष झालो राजकारणात आहे, मी कधी निवडणुकीत पैसे वाटलेच नाहीत, असे तावडे म्हणाले. कोणीही काही आरोप केले तरी मला काही फरक पडत नाही, असेही विनोद तावडे म्हणाले. हितेंद्र ठाकूर म्हणाले, निवडणूक आयोगावर प्रशासनाचा दबाव आहे. माझ्यावर कोणाचा दबाव नाही, मात्र निवडणूक आयोगावर प्रशासनाचा दबाव आहे हे निश्चित आहे. माझी इथे कसली दादागिरी नाही. जे पैसे सापडले ते काय माझे होते? 48 तासांआधी मतदारसंघातून जायचे असते, तरी ते थांबले कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Share

-