पुण्यात आचारसंहितेचा भंग:आमदार सुनिल शेळके यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मावळ मतदारसंघात अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या लोणावळा येथील प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये बळजबरीने घुसून, त्यांना बाजूला सारून पोलिसांच्या सूचना न मानता भांगरवाडी राम मंदिरात जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल शेळके आणि त्यांच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात शांतता आणि आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता क्रमांक 223,352,3 (5) कलम नुसार आमदार सुनिल शेळके (रा. तळेगाव), प्रदीप कोकरे, मंगेश मावकर, धनंजय काळोखे (सर्व रा. लोणावळा) व इतर 10 ते 15 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार शेखर भास्कर कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार शनिवारी (दि.9) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास राम मंदीर, लोणावळा याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनिल शेळके त्यांच्या ताफ्यासह आले. नियोजित दौऱ्यानुसार ते सकाळी 11 वाजता याठिकाणी असलेल्या लोहगड उद्यान येथे अपेक्षित होते. आणि घटना घडली त्यावेळी म्हणजे सायंकाळी 5 वाजता ते जुना खंडाळा या परिसरात असणे अपेक्षित असताना देखील ते निवडणूक निर्णय अधिका-याने दिलेला आदेश न पाळता सायंकाळी 5 वाजता लोहगड उद्यान येथे आले. त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची प्रचार सभा सुरु होणार असल्याचे आमदार शेळके यांना माहीत होते. या प्रचार सभेसाठी बापूसाहेब भेगडे यांनी रीतसर परवानगी घेतली होती. शिवाय राम मंदीरात जाण्याचे आमदार शेळके यांच्या दौ-यामध्ये नियोजीत नसताना देखील पोलिसांच्या सूचना न मानता आमदार सुनिल शेळके हे सदर ठिकाणी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारासाठी जमलेल्या कार्यकत्यांना बाजूला करून राम मंदीरात गेले. उमेदवार सुनिल शेळके व त्यांच्या सोबत असलेले प्रदीप कोकरे, मंगेश मावकर, धनंजय काळोखे व इतर 10 ते 15 कर्यकर्ते यांनी प्रचार दौ-याचा भंग केला. तसेच बापूसाहेब भेगडे यांचे प्रचारसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना बाजुला करुन सहा. निवडणुक अधिकारी यांनी घालून दिलेल्या अटी व शर्तीचा व शांतेतेचा भंग केला, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share