आमच्याकडे कमिटी नाही थेट डीबीटी:हरियाणाचा ढोल पिटणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली, महाराष्ट्रात तेच होईल; एकनाथ शिंदेंचा घणाघात

महाराष्ट्रातील सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्याच्या मार्गावर असल्याची टीका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र, कोणीही ‘माय का लाल’ आला तरी योजना बंद पडणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पहिल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकारमधील कार्यकाळ पहा आणि मागच्या दोन सव्वा दोन वर्षात आम्ही केलेला कामाचा कार्यकाळ पहा. फरक तुम्हाला स्पष्ट दिसेल, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. राज्य सरकारच्या सर्व योजनांमध्ये आडवे येण्याचे काम विरोधक करत आहेत. मात्र त्यांना आडवे करण्याचे कामच जनता करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आमच्या कार्यकाळात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. हरियाणा मध्ये आमचा विजय होणार असे ढोल वाजत होते. मात्र हरियाणाच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. आता महाराष्ट्रात देखील तसेच होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मी गरीब कुटुंबातून आलो आहे. मी गरीबी पाहिलेली आहे. माझी आई कशी तगमग करायची. कशा पद्धतीने कुटुंब चालवायची, हे मी पाहिले आहे. त्यामुळे माझ्याकडे अधिकार येताच, सर्वात आधी आमच्या लाडक्या बहिणीसाठी हा निर्णय घेतला. लाडक्या बहिणींना पैसे दिले जात आहेत. हा निर्णय आम्ही का घेऊ नये? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आहे. हे गोरगरिबांचे सरकार आहे. अधिकाऱ्यांनी देखील सर्वसामान्यांचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा एकही अधिकारी जागेवर ठेवणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. हे जनतेचे राज्य आहे. सर्वसामान्य व्यक्तीचे राज्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… कोणत्याच नेत्याने मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये:उद्धव ठाकरेंची मागणी वडेट्टीवारांनी पुन्हा फेटाळली; पक्षातील नेत्यांचेही टोचले कान कोणत्याही नेत्याने मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, असे म्हणत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे यांची मागणी पुन्हा एकदा फेटाळली आहे. याबरोबरच त्यांनी त्यांच्या काँग्रेस पक्षातील नेत्यांचे देखील कान टोचले आहे. मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीला अजून वेळ आहे. आधी विधानसभा निवडणुका होतील, त्यानंतर मुख्यमंत्री निवडायची वेळ येईल. त्यावेळी या विषयावर चर्चा करता येईल. मात्र, आता महायुतीला सत्तेतून बाजूला सारणे महत्त्वाचे असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा… गांधी घराण्याचे निकटवर्तीय शिंगडां कुटुंबाचा काँग्रेसला धक्का:वडील पाच टर्म खासदार, आता मुलगा मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा पालघर तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. पाच टर्म सत्ता भोगणारे माजी खासदार दामू शिंगडा यांचे पुत्र सचिन शिंगडा हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. माजी खासदार दामू शिंगडा हे गांधी घराण्याचे अंत्यंत निकटवर्तीय नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र, त्यांच्या कुटुंबाने काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पूर्ण बातमी वाचा… दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका:वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला केले आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने टोल न घेण्याची मागणी करण्यात आली आहे. पूर्ण बातम्या वाचा…

Share

-