आम्ही कुठे खाल्ले त्याचे पुरावे द्या:उद्धव ठाकरेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर, आघाडीच्या पंचसूत्रीवरही केली टीका

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांनी आम्ही तिघे भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ, अशी टीका महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर केली होती. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, निवडणुकीच्या काळात अशा टीका होतच असतात. ते जर म्हणत असतील खाऊ, तर पुरावे द्या न, तुम्ही सांगा, की हे असे असे टेंडर होते इथे असे हे लोवेस्ट होते, इथे असे केले. असे नुसते भाऊ खाऊ माऊ, असे म्हणून नाही चालत. महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीवर टीका
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या पंचसूत्रीवर बोलताना अजित पवार म्हणाले, मघाशीच माझे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत यावर बोलणे झाले. बेरोजगार तरुणांना 4 हजार रुपये महिन्याला देणार. इकडे 3 हजार आणि कर्जमाफी वगैरे. यात जवळपास 3 लाख कोटींचा हिशोब जातोय. यावेळेस आपले बजेट आहे साडे सहा लाख कोटींचे, पुढच्या वेळेस ते होईल 7 लाख कोटींचे होईल. यातले निम्मे जातात पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचे व्याज. यातून निम्मे राहिलेले यात घालणार आणि मग काय विकासकामांसाठी कुठून आणणार आहेत? केंद्र सरकार सुद्धा यांच्या विचारांचे नाही त्यामुळे यांना तिकडून पण मिळतील अशातला काही भाग नाही. उगी आपले काहीही बोलायचे. महायुती सरकारवरही टीका होते, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आमच्या सरकारवर टीका करताना आम्ही या सगळ्या योजना साधारण 75 हजार कोटींपर्यंत घेऊन गेलो होतो. त्यांच्या योजना आणि ते लाभार्थी जर बघितले तर ते जात आहे 3 लाखांपर्यंत. हे फॅक्ट आहे. ते म्हणत होते की आम्ही देऊ शकणार नाहीत आणि तुम्ही आता त्यात वाढ करताय, दुप्पट वाढ तिप्पट वाढ करत आहेत. हे कसे शक्य आहे? ही निव्वळ महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. वाचाळवीरांनी कुठेतरी थांबले पाहिजे
सदाभाऊ खोत यांच्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, विनाश काले विपरीत बुद्धी. प्रत्येकाने तारतम्य बाळगले पाहिजे. वाचाळवीरांनी कुठेतरी थांबले पाहिजे. आज इतके महत्त्वाचे मुद्दे तुमच्या आमच्या समोर आहेत. लोक काय म्हणतील. हे काय नेते आहेत, असा प्रश्न त्यांना पडत असेल. मागच्या वेळेस भटकती आत्मा असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता, तेव्हा काही का बोलले नाहीत, असा प्रश्न विचारला असता त्यावर अजित पवार म्हणाले, तेव्हा त्यांनी नाव न घेता टीका केली होती. मला त्यावेळी समजले नव्हते की हे भटकती आत्मा नेमके कोणाला म्हणत आहेत. नंतर मला समजल्यावर मी ठरवले होते की यांना तुम्ही भटकती आत्मा कोणाला म्हणाले होते. मात्र सदाभाऊ खोत यांनी सरळ नाव घेत टीका केली होती. हे काही बरोबर नाही. कोणाबद्दलही असे बोलू नये.

Share