महिला, मुलांसाठी ‘आयसीयू’सह पुन्हा 2 सरकारी रुग्णालये:एका रुग्णालयाचे काम सुरू, दुसरे निविदा प्रक्रियेत, एनएचएमच्या माध्यमातून 100 खाटांची इमारत बांधकाम
महिला व बालकांवरील उपचार अधिक सुलभ होण्याच्या दृष्टीने अमरावती शहरात प्रत्येकी १०० खाटांची दोन सरकारी रुग्णालये उभारण्यात येत आहेत. यापैकी एक जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात, तर दुसरे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरात निर्माण होईल. विशेष म्हणले जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील नव्या हॉस्पिटलमध्ये ५० खाटांचा अतिदक्षता विभागही असेल. या दोन्ही रुग्णालयांचे बांधकाम ‘पीएम-अभीम’ (प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन) या नावाने केले जात असून, ही योजना राष्ट्रीय आरोग्य मिशनचाच ((एनएचएम) एक भाग आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सध्याचा अतिदक्षता विभाग कमी खाटांचा आहे. त्यामुळे तेथे बरेचदा रुग्ण अधिक आणि खाटा कमी अशी स्थिती निर्माण व्हायची. प्रस्तुत हॉस्पिटलमुळे ही उणीव भरून निघेल. ही नवी इमारत जी प्लस थ्री अर्थात तीन मजली असेल. १४०० चौरस फूट जागेत ती उभी होत आहेत. त्यासाठी एनएचएममार्फत २३ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या इमारतीमध्ये माता व बालकांवर सर्व प्रकारच्या उपचाराची सुविधा असेल. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर बाबीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. डफरीन हॉस्पिटल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालयाची सध्याची इमारत कालबाह्य झाल्यामुळे शासनाने नुकतीच नवी इमारत बांधून दिली आहे. येत्या काही दिवसांत त्या इमारतीतून कामकाज सुरू होईल. तिला पूरक ठरणारी आणखी १०० खाटांची नवी इमारत एनएचएमद्वारे बांधली जाणार आहे. १०० खाटांचे हे रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीला लागून असलेल्या जागेत उभे होईल. त्यासाठी ३३ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी प्राप्त झाली असून, येत्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान एनएचएमचे मुंबई येथील अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार यांच्या निर्देशानुसार त्यांची स्थानिक यंत्रणा या दोन्ही इमारतीच्या बांधकामांवर लक्ष ठेवून आहे. इतिहासात प्रथमच ‘एनएचएम’कडून बांधकाम ‘एनएचएम’च्या माध्यमातून बांधकाम ही जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच बाब आहे. हॉस्पिटलच्या नव्या इमारती किंवा जुन्या इमारतींची डागडुजी या बाबी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे सद्य:स्थितीत उभ्या असलेल्या आरोग्य विभागाच्या सर्व इमारती साबांविनेच बांधल्या आहेत. या वेळी मात्र पहिल्यांदाच हे दोन नवे हॉस्पिटल्स एनएचएमद्वारे उभारली जातील. जुलैपर्यंत चालेल बांधकाम ^या इमारतीच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश सप्टेंबर २०२४ मध्येच दिला . कंत्राटदारांना ३०० दिवसांचा अवधी दिला आहे. त्यानुसार जुलैपर्यंत या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. -डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.