हिंदूंमध्ये देवता आराधनेतून हिंदुत्व येईल:जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांचे प्रतिपादन

सर्व जीवांमध्ये परमेश्वराने केवळ माणसालाच धर्मपालनाची शक्ती प्रदान केली आहे. त्यामुळे प्रत्येकाने धर्मपालन करीत राहणे आवश्यक आहे. धर्मपालन कार्यात आपण वेदांचा आश्रय घेतो. वेदांमध्ये काय करावे, काय नाही, हे दिलेले आहे. हिंदूंमध्ये देवता आराधना व उपासनेतूनच हिंदुत्व येईल, असे अनंतश्रीविभूषित पश्चिमान्माय द्वारका शारदापीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांनी सांगितले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्री सदानंद सरस्वती महाराज म्हणाले, माणसाला अनेक जन्माचे फळ जेव्हा प्राप्त होते, तेव्हा त्याला सत्कर्माची, परमात्म्याचे दर्शन करण्याची आणि साधू-संतांसोबत सहवासाची इच्छा उत्पन्न होते. मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे. परमात्माप्रातीचे जे श्रेष्ठ उपाय सांगितले आहेत, त्यात गणपतीपूजन हा सर्वप्रथम आणि सर्वश्रेष्ठ उपाय आहे. गणेशाची पूजा भगवान महादेव, श्री विष्णू यांनी देखील केली, त्यामुळे गणेशाला प्रथमपूज्य मानले जाते. गणपती हे सर्वांचे कुलदैवत आहे. ते पुढे म्हणाले, आम्ही तीन वेळा दगडूशेठ गणपती मंदिरात आलो आहोत. आमचे गुरुजी आणि मोठे गुरुजी देखील येथे येऊन गेले आहेत. दगडूशेठ गणपती मंदिर हे सिद्ध मंदिर असून येथील श्री गणेशाची मूर्ती ही सिद्ध मूर्ती आहे, असे सांगत त्यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती घेत कौतुक केले. शंकराचार्यांनी यावेळी गणरायाला अभिषेक केला, तसेच आरती देखील केली.

Share