योजनांना हिंदू देवतांचे नाव देणे चुकीचे:मल्हार सर्टिफिकेशनचे नाव बदलावे, श्री क्षेत्र जेजुरी संस्थानच्या विश्वस्तांचे नीतेश राणेंना पत्र
भाजप आमदार आणि मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार केला आहे. आता मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मात्र, या योजनेचे नाव त्वरीत बदलावे, अशी विनंती जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी नीतेश राणे यांना केली आहे. श्री मल्हार म्हणजे खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे. त्यामुळे या योजनेचे नाव बदलण्यात यावे, अशी विनंती जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी केली आहे. याबाबत त्यांनी नीतेश राणेंना एक पत्र देखील पाठवले आहे. डॉ. राजेंद्र खेडेकरांनी पत्रात काय म्हटले? आपण आज घेतलेला निर्णय अत्यंत सार्थ आहे, जेणेकरून उत्तर प्रदेश सारखाच आपण कोणाकडून मांसा विक्री खरेदी करतोय हे समजायला मदत होईल. तसेच गोमांस किंवा कुत्रे मांस विक्रीला आळा बसेल. मात्र हे करताना एक मल्हार भक्त म्हणून महत्त्वाची सूचना करावी असे वाटते. या योजनेचे नाव आपण त्वरित बदलावे…अशी आमची आधी आपल्याला विनंती आहे. श्री मल्हार म्हणजे खंडोबा… अवघ्या महाराष्ट्राचे दैवत. ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे. देवाला फक्त पुरणपोळी किंवा चंपाषष्ठीच्या काळात वांग्याचे भरीत रोडगा नैवेद्य असतो. इतकेच नव्हे तर खंडोबा ही देवता मुक्या जनावरांवर नितांत प्रेम करणारी देवता आहे. म्हणून देवाच्या बाजूला नेहमी घोडा, कुत्रे, बैल आदी प्राण्यांचा सहवास असतो. मुळातच या योजनांना कोणत्याही हिंदू देवतांचे नाव देणे हे चुकीचे आहे. मी जरी श्री मार्तंड देव संस्थानाचा विश्वस्त असलो, तरी विश्वस्त मंडळाची भूमिका या विषयी काय आहे, मला माहीत नाही. मात्र, माझी भूमिका फक्त नाव बदलण्यात यावे एवढीच आहे. त्यामुळे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की, या योजनेचे नाव मल्हार सोडून दुसरे कोणतेही ठेवावे, असे श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. काय म्हणाले होते नीतेश राणे? नीतेश राणे यांनी ट्विटरवरून मल्हार सर्टिफाइड झटका मांसची घोषणा केली. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम (http://malharcertification.com) या निमित्ताने सुरू झालेले आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकाने उपलब्ध होतील व 100 टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेले आढळणार नाही. मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये असा आवाहन यानिमित्ताने मी करतो. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित.