तुम्ही परिवर्तनवादी चळवळ मोठी केली, तुम्हीच उर्जास्रोत:‘आम्ही भारतीय जनसांस्कृतिक चळवळ’तर्फे वृद्ध कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता

प्रतिनिधी | अमरावती तुम्ही चळवळीला मोठे केले. समाजाच्या उत्थानासाठी मोठे योगदान दिले. प्रसंगी तुरुंगवास भोगला, पण डगमगले नाही. डाव्या व परिवर्तनवादी चळवळीला तुमचे हे योगदान कदापिही विसरता येणार नाही. त्यामुळे तुम्हीच आमचे उर्जास्रोत आहात, या शब्दात ज्येष्ठ कवयित्री, लेखिका संध्या सराटकर यांनी वृद्ध कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ‘आम्ही भारतीय जनसांस्कृतिक चळवळ’तर्फे आयोजित वृद्ध कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. श्याम नगरस्थित एमएसएमआरए भवनात आयोजित या कार्यक्रमाला प्रा. डॉ. शांताराम चव्हाण व आयोजन समितीचे संयोजक हरीश चरपे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना, शिरीन खान, प्रा. शरद पुसदकर, दिलीप नाहटा, माधव गिरी, बाबा भाकरे उपस्थित होते. याप्रसंगी परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळीतील ४३ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान केला. संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, गुलाबराव महाराज अशा तपस्वींची भूमी असलेल्या अमरावती जिल्ह्याला कुष्ठमित्र पद्मश्री दाजीसाहेब पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख या समाज सुधारकांचा वारसा आहे. नेमकी तशीच कृती खा. सुदाम देशमुख (काका), आ. भाई मंगळे, वर्धा जिल्ह्यातील खा. रामचंद्र घंगारे यांनी त्यांच्या कारकीर्दीत केली. विशेष म्हणजे या नेत्यांच्या काळात अनेक कार्यकर्ते घडले. अशा सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांना आम्ही भारतीय जनसांस्कृतिक चळवळीच्या वतीने सन्मानित करण्यात आले. हे सर्व कार्यकर्ते आजघडीला सत्तरी पार केलेले असून काहींनी शतकही गाठले आहे. या सर्वांना सन्मानपत्र, शाल व पुस्तक भेट देण्यात आले. तसेच प्रत्येकाच्या कार्याचा आढावाही घेण्यात आला. या वेळी सन्मानित केलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ हिरुळकर, माजी सरपंच शेख मुश्ताक शेख मिरन, सहदेव शेंडे, रामदास वाडेकर, श्रीधरराव कुकडे, दादाराव कमळापुरे, डॉ. नामदेव बदरके, मुख्याध्यापक एम. वाय. शहाणे, प्रा. अरविंद मेहता, प्रभाकर आकोटकर, ज्ञानेश्वर हरमकर, अॅड. सुरेश उंबरकर, प्रा. अरविंद वानखडे, बाबा उंबरकर, प्रा. साहेबराव विधळे, रमेश कांबळे, अॅड. यशवंत सराटकर, यादव पाखरे, गणेश हरमकर, साहेबराव सूर्यवंशी, सदाशिव विघ्ने, विश्वनाथ नेवारे, देविदास राऊत, प्रकाशचंद्र आराध्य, प्रताप शिवणेकर, लीलाबाई लाखोडे, अन्नपूर्णा इंगळे, सावित्री चंद्रापुरे, वीज कामगारांचे पुढारी पी. बी. उके, महादेव वरठे, अॅड. जनार्दन आदमन, दादासाहेब मेटांगे आदींचा समावेश आहे. प्रास्ताविकातून डॉ. प्रकाश मानेकर यांनी आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री व कर्मयोगी मार्गदर्शक, मार्क्सवादी नेते कुमार शिराळकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन कुमुदिनी वाडेकर व हर्षा सगणे यांनी केले. आभार प्रफुल्ल कुकडे यांनी मानले. लोककवी हेमंत टाले यांनी महात्मा गांधी यांच्यावर गीत सादर केले. या वेळी विवेक वाडेकर, मुकुंद काळे, प्रा. प्रवीण बनसोड, प्रा. प्रसेनजित तेलंग, याकूब पठाण उपस्थित होते. वय शंभर, पण अजूनही तोच बाणा सत्कार झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये १०० वर्षीय ज्येष्ठ गांधीवादी व सर्वोदयी कार्यकर्ते एकनाथ (नाना) हिरुळकर आणि ९४ वर्षीय कुऱ्हाचे (ता. तिवसा) माजी सरपंच येथील शेख मुश्ताक शेख मिरन यांचाही समावेश आहे. सत्कार स्वीकारताना या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि भावविश्व पाहता त्यांची वैचारिक ठेवण आणि बाणा अजूनही कायम असल्याचे दिसले.

Share

-