कमी दरात सोने देतो म्हणत 15 लाखाचा गंडा:त्रासाला कंटाळून 44 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या, वसमतमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल
वसमत येथे तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पाच जणांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 13 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील जितामातानगातील संतोष रामराव कड (44) यांना शहरातील सुर्यकांत कातोरे, रमाकांत कातोरे व एक महिलेने कमी दरात सोने देण्याचे अ्मिष दाखविले. सदर सोने देण्यासाठी 15 लाख रुपये देण्याची मागणी केली. स्वस्तात सोने मिळत अल्यामुळे संतोष यांनी त्यांना 15 लाख रुपये दिले. मात्र पैसे मिळाल्यानंतर त्यांनी सोने देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संतोष यांनी सोने नको तर माझे पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र त्याच्याकडे तिघांनीही दुर्लक्ष केले. यामुळे ते अस्वस्थ झाले होेते. या शिवाय संतोष यांनी शहरातील संजय काकडे व हनुमंत भालेराव यांच्यासोबत घराच्या विक्रीचा करार केला होता. या करारनाम्यानुसार त्यांनी उर्वरीत सहा लाख रुपयांची रक्कम देणे अपेक्षीत होते. संतोष यांनी सदर रकमे बाबत दोघांकडे विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन दमदाटी करण्यास सुरवात केली. तसेच मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून संतोष यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी उत्तम कड यांनी वसमत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी वरील पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड, उपनिरीक्षक केंद्रे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केल्याचे सुत्रांनी सांगितले.