उकळते दूध अंगावर पडल्याने जखमी 8 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू:दहा वर्षीय भाऊही झाला होता जखमी; बडनेरातील बोथरा नर्सरीतील घटना

बडनेरा ते अकोला मार्गावरील बोथरा नर्सरीमध्ये कुल्फी तयार करण्यासाठी दूध गरम करण्यासाठी ठेवले होते. त्याच ठिकाणी आठ व दहा वर्षांची दोन भावंडे खेळत होती. त्यावेळी अचानक दुधाची कढई खाली पडली व दोन्ही मुलं उकळत्या दुधामुळे भाजल्या गेली. ही घटना २० नोव्हेंबरला घडली होती. यामध्ये जास्त प्रमाणात भाजलेल्या आठ वर्षीय मुलाचा बुधवारी (दि. २७) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. संजय दादू मावस्कर (८, रा. मालनी, भैसदेही ह. मु. बोथरा नर्सरी, बडनेरा) असे मृत बालकाचे नाव आहे. तसेच अनेश दादू मावस्कर (१०) असे जखमीचे नाव आहे. दादू मावस्कर हे मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या कुटुंबासह बोथरा नर्सरीमध्ये वास्तव्यास आहेत. नुकतेच त्यांनी त्याच ठिकाणी कुल्फी बनवण्याचे काम सुरू केले होते. २० नोव्हेंबरला कुल्फी बनवण्यासाठी दूध उकळण्यासाठी कढईत टाकले होते. त्याचवेळी संजय आणि अनेश हे तेथे खेळत असतानाच अचानक उकळत्या दुधाची कढई खाली पडली आणि त्यामधील दूध अंगावर गेल्याने संजय गंभीर स्वरुपात तर अनेशचे पाय भाजले. दोघांनाही तातडीने पीडीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी अनेशवर उपचार करून त्याला सुटी दिली होती. गंभीर भाजल्यामुळे संजयवर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच २० नोव्हेंबरला संजयचा मृत्यू झाला. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाची चौकशी हेड कॉन्स्टेबल नीलेश गुल्हाने करत आहेत.

Share

-