वयाच्या 95 व्या वर्षी EVM विरोधात एल्गार:बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण, म्हणाले – लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केले आहे. राज्यघटना आणि लोकशाहीची सध्या थट्टा सुरू असल्याची त्यांनी टीका केली. बाबा आढाव पुणे येथील फुले वाडा येथे आंदोलनाला बसले आहेत. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी 3 दिवसांचे आत्मक्लेश उपोषण सुरू केले. ईव्हीएमवरील मतदान प्रक्रिया संशयास्पद म्हणत लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू असल्याचे बाबा आढाव म्हणाले. छगन भुजबळ यांनी आंदोलन स्थळी बाबा आढाव यांची भेट घेतली. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव म्हणाले, ईव्हीएम मतदान प्रक्रियेवर संशयाला जागा आहे. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर येणारी आकडेवारी रोज वाढते. विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचे वस्त्रहरण करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीला लोकांचा निर्णय वेगळा आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीला वेगळा निकाल कसा लागतो? असा प्रश्न आढाव यांनी केला. ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे हा निकाल लागला आहे. मी तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. त्यानंतर सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार असल्याचे बाबा आढाव यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने आक्षेप न घेणे अनाकलनीय
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. अदानींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिले जात नाही. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे याबाबत मी सरकारच्या विरोधात मी सत्याग्रह करणार आहे. सरकार जर चुकत असेल तर त्यांना वेळीच सांगितले पाहिजे. लोकशाहीतील एक नागरिक म्हणून माझे ते कर्तव्य आहे. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कोणताही आक्षेप घेतला नाही, हे अनाकलनीय आहे, असे बाबा आढाव म्हणाले. हे ही वाचा… काँग्रेसकडून EC च्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह:रात्रीतून 76 लाख मते कशी वाढली? उत्तर द्या -नाना पटोले; व्हिडिओ पुरावेही मागितले मतदान प्रक्रिया झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या टक्केवारी विषयी जनतेला देत असते, अशी प्रक्रिया आतापर्यंत सुरू होती. मात्र महाराष्ट्र निवडणूक आयोगाने कोणताही पत्रकार परिषद घेतली नाही. रात्रीतून 76 लाख मतांची वाढ झाली. ही वाढ कशी झाली? असा सवाल नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. सविस्तर बातमी वाचा… MVA नंतर मनसेलाही ईव्हीएमवर संशय:राज ठाकरे यांचे पराभूत उमेदवारांना ईव्हीएम विरोधात पुरावे गोळा करण्याचे निर्देश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात मनसेच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. राज ठाकरे यांनी उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पराभूत उमदेवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. निवडणुकीत कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरले यावरही बैठकीत चर्चा झाली. राज ठाकरे यांनी सर्वांची मते ऐकून घेतली. तसेच ईव्हीएमबाबत पुरावे गोळा करण्याच्या सूचना उमेदवारांना दिल्या. या सर्व घडामोडींवर राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडणार आहेत. पूर्ण बातमी वाचा…

Share

-