​​​​​​​महाविकास आघाडीत 28 जागांवर रस्सीखेच:260 जागांवरील तिढा सोडवण्यात यश, तिन्ही पक्षांच्या नेत्यांची मुंबईत माथापच्ची सुरू

महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील 288 पैकी 260 जागांवरील तिढा सोडवण्यात यश आले आहे. पण या आघाडीतील तिन्ही मित्रपक्षांत 28 जागांवर कमालीची रस्सीखेच सुरू असल्यामुळे जागावाटपाची चर्चा अजून लांबण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी आजच आपले जागावाटप फायनल करण्याच्या मूडमध्ये असल्याचीही चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीत आघाडीच्या जागावाटपाचा मुद्दा हातावेगळा काढण्याची चर्चा सुरू आहे. याच बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार असून उमेदवारांची नावे देखील निश्चित केली जाणार आहेत. महाविकास आघाडीच्या या बैठकीला ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून शरद पवार, जयंत पाटील, तर कॉंग्रेस पक्षाकडून नाना पटोले उपस्थित असल्याचे बोलले जात आहे. यांच्यासोबत इतर नेते देखील उपस्थित आहेत. महाविकास आघाडीमधील 260 जागांवरील तिढा सुटला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र 20 ते 25 जागांवर मात्र तिढा कायम असल्याचे समजत आहे. या जागांवर महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांनी दावा केला आहे. मात्र लवकरच यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईच्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांची घोषणा करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांच्या उमेदवारीची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात यासंदर्भातील घोषणा केली आहे. अनिल परब म्हणाले, मी काही दिवसांपूर्वी साहेबांना भेटलो. त्यानंतर आम्ही सगळेच पदाधिकारी त्यांना भेटलो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वरुण सरदेसाई यांचे नाव निश्चित केले आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

Share

-