प्रमुख पक्षांचे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उद्यापासून होणार जाहीर सभा:शहरात उमेदवारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, बैठकांसह उडणार प्रचारसभांचा धुरळा
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. उमेदवार प्रत्यक्ष गाठीभेटी, पदयात्रा, बैठका, कॉर्नर बैठका आदींवर भर देत आहेत. 9 नोव्हेंबर 2024 पासून राज्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा सुरू होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी असल्यामुळे राष्ट्रीय नेते, केंद्रीय मंत्री, राज्यातील प्रमुख पक्षांचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींच्या जाहीर सभा होणार आहेत. शहरात छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघात 9 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बजरंग चौकात सभा होणार आहे. एआयएमआयएमचे अकबरोद्दीन ओवेसी यांचीही सभा नुकतीच आमखास मैदानावर झाली. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेसाठी प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. महायुतीसमोर मोठे आव्हान राज्यात असल्याने प्रचारासाठी स्टार प्रचारकांची मोठी यादी आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी याशिवाय एआयएमआयएमच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. विविध राजकीय पक्षांनी सभेसाठी तयारी सुरू केली आहे. वॉर्डावॉर्डांतून सभेसाठी कार्यकर्त्यांना उपस्थित राहता यावे यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच राजकीय संभाच्या स्थळाची पाहणी करून तयारीचाही आढावा स्थानिक नेत्यासह उमेदवार घेत आहेत. या राजकीय नेत्यांच्या होणार शहरात सभा आचारसंहितेचा बडगा असल्याने सर्व बाबींमध्ये सावधानता बाळगली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा आदींच्या सभांचे आयोजन केले आहे. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, तर सायंकाळी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होईल. भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सभांचे आयोजन केले आहे.