एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू:अपघातात आई वडिलांसह मुलानेही गमावला जीव, अंजनवाडी गावावर शोककळा

परभणी ते वसमत मार्गावर असोला पाटीजवळ भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. १० दुपारी घडली आहे. या अपघातातील तीनही मयत अंजनवाडी (ता. औंढा नागनाथ) येथील असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथील एकनाथ बाबाराव घुगे (३५) त्यांची पत्नी शुभांगी एकनाथ घुगे (३०) व त्यांचा मुलगा समर्थ एकनाथ घुगे (१२) हे आज सकाळी समर्थ आजारी असल्याने त्याची प्रकृती दाखविण्यासाठी दुचाकी वाहनावर (एमएच-३८-एसी-८३७१) परभणी येथे गेले होते. त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयावर समर्थ याची प्रकृती दाखविल्यानंतर ते तिघेही गावाकडे परत निघाले होते. दरम्यान, परभणी ते वसमत मार्गावर असोला पाटी शिवारात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तिघेही रस्त्यावर आदळले. त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. या अपघातामुळे परभणी ते वसमत मार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. या मार्गावरील प्रवाशांनी अपघाताची माहिती परभणी पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच ताडकळस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे यांच्यासह नवा मोंढा पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणीच्या शासकिय रुग्णालयात हलविले आहेत. त्यानंतर पोलिसांनी या मार्गावरील वाहतुक सुरळीत केली. एका ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान, एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने अंजनवाडी गावावर शोककळा पसरली आहे. मयत एकनाथ घुगे हे रिसोड आगारात वाहक पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात आई, वडिल, भाऊ असा परिवार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Share

-