अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा प्रयत्न:माओवाद्यांचा गडचिरोलीच्या पर्लकोटा नदीलगत स्फोट घडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणून पूल उडवून देण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला आहे. माओवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके पेरून ठेवल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करण्यासाठी गडचिरोलीहून एक बॉम्ब शोध व नाशक पथक हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आले. छत्तीसगड सीमेवरील नक्षलप्रभावित भामरागड येथे पर्लकोटा नदीजवळ नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उद्या गृहमंत्री अमित शहा प्रचारसभेसाठी गडचिरोली येत आहेत. नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने हा स्फोट घडवून आणायचा होता असा संशय पोलिसांना आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान प्रभावीपणे राबविल्याने नक्षल्यांची काहीशी पिछेहाट झाली आहे. मात्र, अधूनमधून त्यांच्या कुरापती सुरु असतात. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्याआधी स्फोट घडवून आणून सुरक्षा यंत्रणेला आव्हान देण्याचे नक्षल्यांचे प्रयत्न होते. नक्षलवाद संपल्याचा शहांनी दिला होता इशारा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी १५ नोव्हेंबरला चंद्रपूरच्या सभेत गडचिरोलीतील नक्षलवाद संपुष्टात आला. ३१ मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडमधील नक्षलवाद संपवू अशी घोषणा केली. सोबतच उद्या १७ नोव्हेंबरला ते गडचिरोलीत येणार आहेत. या घोषणेनंतर काही तासांतच भामरागडमधून स्फोटके नष्ट केल्याची बातमी आली. यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ कंपनी आणि बीएसएफ कंपनीच्या एकत्रित पथकाने परिसरात शोध मोहीम सुरू केली. शोध मोहीमे दरम्यान पथकांना भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन स्फोटके सापडले. बीडीडीएस पथक स्फोटके निष्क्रिय करण्याची तयारी करीत असताना एका स्फोटकाचा स्फोट झाला, तर दुसरे स्फोटक बीडीडीएस पथकाने घटनास्थळावर नष्ट केले. यात सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही. तसेच माओवाद्यांनी परिसरात आणखी कुठे स्फोटके पेरून ठेवलेली आहे का? याचा शोध घेण्यासाठी अजून शोध मोहीम सुरू आहे. गडचिरोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचे विधानसभा निवडणूकीत घातपात करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे