अनिल देशमुखांना जीवे मारण्याचा प्रयत्न:खासदार संजय राऊत यांचा भाजप तसेच फडणवीसांवर निशाणा; हल्लेखोर भाजपच्या घोषणा देत असल्याचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला पाहिला तर त्यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ला करताना भारतीय जनता पक्षाच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याचे माजी गृहमंत्री यांना ठार मारण्याच्या हेतूने हल्ला झाला होता, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या होते तर दुसरीकडे माजी गृहमंत्र्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होतो. यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात हे कायदा व सुव्यवस्थेचे निघालेले धिंदोडे आहेत. आणि त्याला राज्यातील सरकार जबाबदार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीने हल्ला झाला, याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला हवी. उद्या मतदान होणार आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षाचा किती कार्यकर्त्यांवर हल्ले होतील, धमक्या येतील किंवा खोटे गुन्हे दाखल होतील, याविषयी आम्हाला चिंता वाटत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. असे प्रकार राज्यभरात सुरू झाले असल्याचा दावा देखील त्यांनी केला. याबाबत उद्धव ठाकरे यांनी देखील चिंता व्यक्त केली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता भारतीय जनता पक्ष हा स्टंट असल्याचा आरोप करत आहे. मात्र आम्हाला नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे स्टंट करण्याची आवश्यकता नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. देशमुखांचे चिरंजीव निवडून येत आहेत. त्यामुळेच हल्ला झाला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ही भारतीय जनता पक्षाची नौटंकी असल्याचा आरोप त्यांनी केला. माजी गृहमंत्र्यांवर हल्ले व्हावे, असे वातावरण आजपर्यंत महाराष्ट्रात नव्हते. हेच आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या काळात झाले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही राज ठाकरे हे गेली 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेल्या स्क्रिप्ट वाचत आहेत. ते कधी नारायण राणे कधी देवेंद्र फडणवीस यांच्या स्क्रिप्ट वाचत असतात. शिवसेनेच्या बाबतीत त्यांना जास्त गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या महाराष्ट्राच्या दुश्मनांना मदत होईल, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र फार गंभीर्याने घेतोय, असे दिसत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राज देखील राणेंना मिठी मारतात उद्धव ठाकरे यांच्यामुळेच नारायण राणी मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच एकनाथ शिंदे यांना आमदारकी मिळाली आणि मंत्री पद मिळाले होते. हे राज ठाकरे यांना बहुतेक आठवत नसेल. असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भुजबळ यांना ठाकरे जेवायला बोलवत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावरुन राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांचा स्वतःचा चष्मा आहे. आणि त्याच चष्म्यातून, त्याच नजरेतून ते सर्व ठिकाणी पाहतात. राज ठाकरे यांना पक्ष सोडून 25 वर्ष झाले आहेत. ते सातत्याने निवडणूक लढवत आहेत. मात्र ते सातत्याने पराभूत होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.