भाजपचे काशिराम पावरा यांना सर्वाधिक मताधिक्य:विधानसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवारांनी किती मतांनी मारली बाजी?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महायुतीचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तेत आले आहे, तर महाविकास आघाडीला अत्यंत दारुण पराभवाला सामोरे जागे लागले आहे. या निवडणुकीत अनेक उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्य देखील मिळाले आहे. भाजपचे काशिराम पावरा यांना शिरपूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 59 हजार 44 मतांनी विजयी झाले आहेत. डॉ. जितेंद्र ठाकूर यांचा पराभव त्यांनी केला आहे. काशीराम पावरा यांना एकूण 1 लाख 78 हजार 73 मते मिळाली असून जितेंद्र ठाकूर यांना 32 हजार 129 मते मिळाली आहेत. बागलान मतदारसंघातून दिलीप बोरसे विजयी ठरले असून त्यांनी 1 लाख 29 हजार 297 मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. तर बारामती विधानसभा मतदारसंघातही अजित पवारांनी 1 लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून संजय उपाध्याय यांनी संजय भोसले यांच्यावर 1 लाख 257 मतांनी मात केली आहे. सातारा मतदारसंघातून भाजप उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांचा 1 लाख 42 हजार 124 मताधिक्याने विजय मिळवला आहे. परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी 1 लाख 30 हजार 224 मतांची आघाडी करत विजय मिळवला. तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांचा 1 लाख 24 हजार 624 मताधिक्याने विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून 1 लाख 20 हजार 717 मताधिक्याने विजय मिळवत ठाकरे गटाचे केदार दिघे यांचा पराभव केला आहे. केदार दिघे यांना 38 हजार 343 मते मिळाली आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांना 1 लाख 20 हजार 41 मताधिक्य मिळाले व ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला आहे.