रामपूर कोकरे येथील संतप्त महिलांचा रौद्रवतार:80 ते 90 महिलांनी अवैध असलेले दारू दुकान पेटवून दिले
श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी पात्रालगत असलेल्या गोवर्धन हद्दीत अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या दुकानात अचानक रामपूर येथील सुमारे ८० ते ९० महिलांनी रुद्रावतार घेत गोवर्धन येथील ओढ्यातील झोपडीवजा दुकान पेटवले. तर वैजापूर तालुका वीरगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलच्या पाठीमागील उसातील देखील अवैध दारूच्या सुमारे १०० पेक्षा अधिक दारूच्या बाटल्या फोडण्याची घटना घडली. ही घटना रविवारी सकाळी घडली. गेल्या तीन चार महिन्यापासून रामपूर (कोकरे ) येथील महिलांनी दारूबंदीसाठी ग्रामसभा घेत पोलिस अधीक्षक तसेच दारू उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक यांना महिलांनी स्वःत नगर येथे जाऊन लेखी स्वरूपात पत्र दिले हाेते. गोदावरी भागातील दारू बंद करण्याची विनंती केली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली व दारू उत्पादन शुल्कचे अधिकारी यांनी सुरुवातीच्या काळात काही ठिकाणी छापे टाकल्याने दारू बंद झाली होती. त्यानंतर रामपूर गाव वगळता लगतच्या गावांत अवैध दारू व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने रामपूर येथील लहान मुलांसह पुरुष मंडळी दारूच्या आहारी गेली. सदर महिला दैनंदिन मजुरीचे काम केल्यानंतर रात्रीच्या वेळी पती-मुले दारू पिऊन व्यसनाधीन होऊन प्रत्येक कुटुंबात वाद -कलह निर्माण होत असल्याने अखेर १ डिसेंबर रोजी सकाळी छबुबाई धनवटे, बबई धनवटे, ताराबाई इरसे, संगीता कोळेकर, रुपाली कुसळकर, रुक्मिणी उपळकर, विजया खैरे, संगीता खैरे, सुरेखा पिटेकर, इथाबाई पांढरे, सुमनबाई जाधव, रेखा जाधव, सुनीता धनवटे, ज्योती पांढरे, आशाबाई पांढरे आदींनी आक्रमक पवित्रा घेत प्रथमतः गोवर्धन हद्दीतील ओढ्यात काटेरी कुंपणात सुरू असलेले अवैध दारूच्या दुकानावर हल्ला केला. आक्रमक महिलांनी झोपडीवजा ग्रीन शेडला आग लावली. त्यानंतर या महिलांनी आपला मोर्चा नाऊर गोदावरी नदीच्या पलीकडे विरगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बाभुळगाव गंगा शिवारातील हॉटेलमध्ये जाऊन संबंधित हॉटेल दुकानदाराला समज देत आमच्या गावातील लोकांना व मुलांना दारू न देण्याचा सल्ला दिला होता. तरीही दारू देत असल्याने सदर महिलांनी हॉटेलच्या पाठीमागे जाऊन उसात लपवलेल्या सुमारे १०० पेक्षा अधिक बाटल्या रस्त्यालगत आणून फोडल्या. अवैध दारू विक्री कायमची बंद करा कर्ता पुरुष गेल्याने मी रोजंदारी करून लहान लेकरांचा सांभाळ तसेच घरातील वृद्ध व्यक्तीचा सांभाळ ही तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापूर्वी गावात अवैध दारूची दुकाने होती. ती बंद झाले असले तरी गावाच्या शेजारी अनेकांनी अवैध दारूची थाटल्याने अबालवृद्धासह मुले देखील व्यसनाधीन होत आहे. आमच्या कुटुंबातील कर्ता पती गेल्याचे दुःख असून इतर महिलांवर अशी वेळ येऊ नये. अवैध दारू विक्री कायमची बंद करावी, अशी मागणी रेखा जाधव यांनी केली.