ही तर लोकशाहीची गळचेपी:हा महायुतीचा नाही तर ईव्हीएमचा विजय, भास्कर जाधव यांची सरकारवर टीका

महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेणे टाळले आहे. हंगामी अध्यक्षांनी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांचे नाव घेताच सर्वजण सभागृहाच्या बाहेर पडले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी बैठक घेतली. या बैठकीत शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. मारकडवाडी येथे ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर आमदार भास्कर जाधव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आमदार भासकार जाधव म्हणाले, आमचा शपथविधीला विरोध नाही, तर विद्यमान सरकार ज्या पद्धतीने सत्तेवर आले त्याला विरोध म्हणून शपथ घेतली नाही. आज आम्ही शपथ घेतलेली नाही, याचा अर्थ कायमची घेणार नाही असे नाही, असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले. भास्कर जाधव म्हणाले, आज आम्ही शपथ घेतली नाही. कारण मारकडवाडीतल्या लोकांनी आपल्या समाधानासाठी मतदान घेण्याचा निर्णय घेतला. पण सरकार इतके घाबरले की त्यांनी 144 लावले. लोकांची धरपकड सुरू केली. ही लोकशाहीची गळचेपी आहे. याचा अर्थ इव्हीएममुळे तुम्ही निवडून आला. तसेच आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आजच्या दिवशी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज आमदारकीची शपथ घेतली नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांच्या या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांना उद्या शपथ घ्यावीच लागेल. त्यानंतरच विरोधी पक्षाच्या आमदारांना पुढील कामकाजामध्ये सहभागी होता येणार आहे, असे स्पष्ट मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे. तसेच हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे.

Share

-