महाविकास आघाडीचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा अपमान:निवडून देणाऱ्या जनतेचाही अपमान; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्या जनतेने त्यांना निवडून दिले, त्याच जनतेचा देखील हा अपमान असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. मात्र हा पराभव ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झाला असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. यासाठी आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी आमदारकीची शपथ देखील घेतली नाही. आता या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाआघाडी मध्ये आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यदर्शनसाठी मुख्यमंत्री अकोले येथे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पिचड यांना श्रद्धांजली मधुकर पिचड यांच्याकडे दलित, वंचित आणि आदिवासींचा आवाज म्हणून पाहिले जात होते. एक राजकारणी म्हणूनच नाही तर एक समाज सुधारक म्हणून देखील त्यांनी चांगले काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आदिवासी आणि वंचित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, याकरता त्यांनी केलेले काम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आदिवासींचा जमिनीचा विषय असेल त्यांच्या इतर हक्कांचा विषय असेल. यासाठी पिचड यांनी सातत्याने संघर्ष केला असल्याचे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. निळवंडे धरणाचे काम थांबलेले असताना विखे पाटील आणि पिचड साहेबांसोबत आमची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत पिचड यांनी मांडलेल्या समस्या दूर केल्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ते काम पूर्ण करून घेतले. त्यामुळेच आज निळवंटाचे पाणी शंभर किलोमीटर पर्यंत शेतकऱ्यांना मिळत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व आमच्यातून निघून गेले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा… बहुमत जनतेने दिलेले की, ईव्हीएमचे?:मारकडवाडी मध्ये जनतेला मॉकपोल का दिला नाही? अधिवेशनात पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे आक्रमक महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आजच्या दिवशी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज आमदारकीची शपथ घेतली नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत एवढा मोठ्या प्रमाणात विजय झाल्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी उत्साह असतो, जल्लोष असतो. मात्र तसे वातावरण राज्यात दिसत नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. महायुतीला मिळालेले बहुमत हे जनतेने दिलेले बहुमत आहे की, ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाने दिलेले बहुमत आहे? असा प्रश्न देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-