शरद पवार लोकशाही मानत नाहीत:त्यांचे नातेवाईक ईव्हीएम घोटाळ्यातून निवडून आले का? गोपीचंद पडळकरांचा पवारांवर हल्लाबोल
शरद पवार लोकशाही मानत नाहीत. जे नातेवाईक निवडून आले ते ईव्हीएम घोटल्याने निवडून आलेत का? असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांनी मरकडवाडीला भेट दिली, त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले, हम करे सो कायदा यासारखे शरद पवार वागत आहेत. शरद पवार लोकशाही मानत नाहीत. जे नातेवाईक निवडून आले ते ईव्हीएम घोटाळ्याने निवडून आलेत का? हे आता ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारत आहेत. अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावाला भेट दिली आहे. ईव्हीएममधून झालेल्या मतदानावर शंका उपस्थित करत माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाच्या विरोधामुळे मतदानाचा प्रयोग बंद पडला. याच ठिकाणी शरद पवार यांनी आज भेट दिली आहे. यावेळी सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, देशाचे अनेक खासदार मला भेटतात, ते एकच चर्चा करतात ती फक्त तुमच्या गावाची. मला विचारतात की हे गाव कुठे आहे? संपूर्ण देशाच्या जे लक्षात आले नाही ते या गावकऱ्यांच्या कसे लक्षात आले? तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन संपूर्ण देश करत आहे, याचाच आम्हा सर्वांना आनंद होत आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील ईव्हीएमवरून टीका केली आहे. कोणावरही ईडीची धाड पडली की, भाजपचे लावारिस भक्तुल्ले चेकाळून म्हणतात, कर नाही त्याला डर कसली? मग लोकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतल्यावर आपापल्या नेत्यांना सांगा ना, घ्या बॅलेटवर निवडणुका. तुम्ही ईव्हीएम सेट नाही केले. तुमच्यासोबत लोकमत आहे, तर बॅलेटवर सिद्ध करा. कर नाही त्याला डर कसली?, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.