दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:समृद्धी महामार्गावरील कृषी केंद्रांसाठी अजूनही निधीची तरतूदच केली नाही; आतापर्यंत 8,310 हेक्टर जमीन संपादित

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर एकूण १८ कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात वर्धा जिल्ह्यातील केळझर, विरूळ, बुलडाणा जिल्ह्यातील साब्रा काब्रा व सावरगाव माळ, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हडस पिंपळगाव व घायगाव, जांबरगाव येथे कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. मात्र, या सातही कृषी समृद्धी केंद्रांसाठी निधीची तरतूद करण्यात आली नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. सातही कृषी समृद्धी केंद्रांसाठी सरासरी ६१% शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना त्यांनी दिलेल्या जमिनींपैकी ३०% विकसित भूखंड देण्याची योजना आहे. तसेच पहिली १० वर्षे प्रतिवर्षी प्रतिएकर जिरायती जमिनीसाठी ४५ हजार, हंगामी बागायतीसाठी ६० हजार रुपये आणि बागायतीसाठी ७५ हजार अनुदान देण्याची योजना आहे. समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ८,३१० हेक्टर जमीन संपादित केली असून त्यापोटी ८,१०२ कोटी मोबदला देण्यात आला आहे.
पुढील महिन्यांत सुरू होणार समृध्दी महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. आतापर्यंत एकूण ७०१ किमी पैकी नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमीचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे.पुढील महिन्यात उर्वरित इगतपुरी ते आमणे (ता. भिवंडी, जि. ठाणे) ही ७६ किमीची लांबी खुली करण्याचे नियोजन आहे. १६९८ पैकी २२९ कोटी खर्च अत्याधुनिक इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमच्या कामाचा संकल्प अहवाल व डिझाइन तयार करण्यात आला आहे. केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ११ जुलै २०२४ मध्ये काम सुरू केलेले काम ११ एप्रिल २०२६ मध्ये पूर्ण करायचे आहे. कामाची एकूण किंमत १६९८ कोटी असून आतापर्यंत फक्त २२९ कोटी खर्च झाल्याची माहिती एसएसआरडीसीच्या सूत्रांनी दिली.
सध्या समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. आठ ठिकाणी पेट्रोल पंप
समृद्धी महामार्गावर एकूण ३० ठिकाणी मार्ग सुविधा उपलब्ध होतील. यामध्ये सर्व सुविधांनी युक्त अशी २२ ठिकाणे असणार आहेत व ८ ठिकाणी फक्त पेट्रोल पंप असणार आहेत. सर्व सुविधांनी युक्त अशा परिपूर्ण मार्ग सुविधा १६ ठिकाणी उभारण्यासाठी ७ ते ८ वेळा निविदा बोलावण्यात आल्या होत्या. परंतु त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचेही समोर आले. गॅस पाइपलाइन फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार पूर्ण गेल कंपनीची गॅस पाइपलाइन टाकली जात आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गाच्या रांगेमध्ये एका बाजूने ३.० मीटर रुंदीची जागा गेल कंपनीस भाडेतत्त्वावर देण्यात आलेली आहे. यासाठी गेल कंपनीकडून ६० वर्षांसाठी ४३५ कोटी भाडे म्हणून घेण्यात आली आहे. ६७० किमीमध्ये गेल कंपनीची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित २८ किमीचे काम फेब्रुवारी २०२५ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Share

-