शिवनेरीच्या भूमीला मंत्रिमंडळात स्थान द्या:अपक्ष आमदार शरद सोनवणे यांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. शरद सोनवणे यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला असून मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून हे आंदोलन त्यांनी सुरू केले आहे. शिवनेरीच्या भूमीला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. आमदार शरद सोनवणे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी शिवनेरीवर पहिला सुवर्ण कलश आणला होता. पहिली कॅबिनेटची बैठक देखील शिवनेरीवर घेतली होती. मात्र, शिवनेरीला मंत्रिमंडळात स्थान नाही. शिवनेरीच्या भूमिला मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी सरकारला माझी विनंती असल्याचे शरद सोनावणे म्हणाले. पुढे शरद सोनवणे म्हणाले, विधिमंडळात मी निवेदन दिले आहे. जुन्नर तालुक्याला स्थान द्यावे ही मागणी मी केली आहे. महायुती सरकार न्याय देईल असा विश्वास देखील शरद सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. 25 वर्ष मी राजकारणात असून अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. यंदा महायुतीसोबत काम करत असल्याचे देखील शरद सोनवणे यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत झाली. मात्र, या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना धक्का देत अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी 73355 मते मिळवत विजय मिळवला आहे. दरम्यान, लवकरच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे चर्चा आहे. येत्या 14 तारखेला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीच्या नेत्यांनी हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे महायुतीच्या नेत्यांकडून बोलले जात आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांना स्थान मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Share

-