पराभव जिव्हारी – बाळासाहेब थोरात दिल्लीत:खरगे, शरद पवारांची घेतली भेट; पक्षांतर्गत बदलाची कोणतीच चर्चा नसल्याचा दावा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच शरद पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांसोबत पवार यांच्या बैठकीला देखील थोरात उपस्थित होते. काँग्रेसची पुढील दिशा आणि वाटचाल या संदर्भात आपण दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली असल्याचे थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील संघटनात्मक बदलाची मात्र, कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा थोरात यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्वांशी चर्चा करत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ईव्हीएम बद्दल जनतेच्या मनात शंका असेल तर सत्ताधाऱ्यांना बॅलेट पेपरची अडचण काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने देखील या संदर्भात निर्णय हा जनतेला अपेक्षीत असा दिला पाहिजे. संशयाचे वातावरण दूर केले पाहिजे, असे देखील थोरात यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर थोरात यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेसची पुढची दिशा काय? काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी देखील या विषयावर चर्चा केली. महाराष्ट्राचे राजकारण, काँग्रेसची पुढची दिशा, हे सर्व ठरण्याच्या दृष्टिकोनातून आमच्यात चर्चा झाली असल्याचे थोरात यांनी सांगितले. निकालाबद्दल देखील जनतेच्या मनात संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे या संदर्भात पुढे काय करायचे? याबाबत देखील आमच्यात चर्चा झाली असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. संघटनात्मक बदलाची चर्चा नाही मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करताना संघटनात्मक बदलाचा कोणताही विषय आमच्यात झालेला नसत्याचेही थोरात यांनी सांगितले. आणखी काही नेत्यांसोबत याविषयी चर्चा करणार असल्याचा दावा त्यांनी केला. लोकांना सोबत घेऊन कसे काम करायचे, याबाबत आमच्यात चर्चा झाली असल्याचे देखील थोरात यांनी सांगितले. शरद पवारांची भेट विधानसभेचा निकाल हा नैसर्गिक निकाल नाही, तो निकाल घडवला गेला आहे. तो घडवून आणलेला निकाल आहे. त्यामुळे आघाडी म्हणून चर्चा करण्यासाठी आपण शरद पवार यांच्याकडे यांच्याकडे आलो असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. या संदर्भात आपण राहुल गांधी यांची देखील योग्य वेळी भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर ईव्हीएम विषयी शंका उपस्थित होत असल्याचा दावा थोरात यांनी केला. ज्याप्रमाणे मारकडवाडी मधील नागरिकांनी भूमिका घेतली तसेच वातावरण राज्यात तयार झाले आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी अनेक गावांमधून समोर येत आहे. अनेकांच्या मनामध्ये संशयाचे वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढची वाटचाल काय असेल? हे ठरवले जात असल्याचे थोरात यांनी सांगितले. त्यासाठी दिल्लीच्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. पक्षाची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीत होत आहे. या बैठकीत पक्षाचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार उपस्थित राहणार आहेत. मतदार यादीतील वाढलेली मते आणि ईव्हीएम बाबत पराभूत उमेदवार शरद पवार आणि वकील अभिषेक सिंघवी यांच्याशी कायदेशीर बाबींवर चर्चा करणार आहेत. आज सकाळी देखील बाळासाहेब थोरात यांच्यासोबत काही पराभूव उमेदवारांनी शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी देखील बॅलेट पेपरवर मतदान घेण्याबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.