परभणीत तणावपूर्ण शांतता; शाळा-काॅलेज बंद:हिंसाचारप्रकरणी 9 महिलांसह 50 ताब्यात

संविधान अवमानाच्या निषेधार्थ बंददरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर शहरात तणावपूर्ण शांतता होती. बुधवारच्या हिंसाचारप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले असून गुरुवारी ९ महिलांसह ५० जणांना अटक करण्यात आली . जमावबंदी दुसऱ्या दि‌वशीही कायम होती. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यामधील अनेक शाळा व महाविद्यालये बंद होती. परिस्थितीनुसार मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शाळा-महाविद्यालय भरवण्याचा निर्णय घ्यावा, असे पत्र शिक्षण विभागाने काढले. गुरुवारीदेखील शहरातील भाजीपाल्याचे लिलाव झाले नाहीत, तसेच काही भागात बाजारपेठ बंद होती. दरम्यान, विधान परिषद विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परभणीतील दंगलग्रस्त भागाची पाहणी करून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. बुधवारी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले. व्यापाऱ्यांच्या दुकानावरील पाट्या तसेच टपऱ्यांची आणि वाहनांची तोडफोड झाली होती. मोर्चा अन् माथेफिरूचा संबंध नाही : सकल हिंदू समाज परभणी येथील संविधान प्रतिमेच्या अवमानाच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला बुधवारी (११ डिसेंबर) हिंसक वळण लागले. यातील संशयित सोपान पवार (४५, रा. मिर्झापूर, ता. परभणी) हा त्याच दिवशी आयोजित हिंदू मोर्चासाठी शहरात आल्याची चर्चा होती. मात्र, या गोष्टीला काहीही आधार नसल्याचे सकल हिंदू समाज जनजागृती समितीचे म्हणणे आहे. १० डिसेंबर रोजी हिंदू मोर्चा हा दुपारी १ वाजताच संपला. त्यानंतर सर्व सहभागी परतले. ही घटना संध्याकाळी ५ वाजता घडली. त्यामुळे व्यक्तीचा आणि मोर्चाचा काहीही संबंध नाही, असे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Share

-