बाधित मुलांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे:निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना, जिंदाल कंपनीच्या वायुगळतीवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

रत्नागिरी येथे जिंदाल कंपनीतून वायुगळती झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले आहे. याच सोबत अनेकांची प्रकृती देखील बिघडली असल्याने एकच खळबळ उडाली होती. यावर आता माजी मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत म्हणाले, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. आजच केस दाखल केली जाईल. निष्काळजीपणामुळे वायुगळती झाली. कंपनीने दिलेली आश्वासणे आणि त्याची परिपूर्णता याचा अहवाल देखील समितीने द्यावा, अशी मागणी उदय सामंत यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, कंपनीकडून काय मिळते याबाबत नागरिकांनी देखील सजग राहावे. कंपनीकडून सुसज्ज हॉस्पिटल होईल यासाठी ग्रामस्थांनी सजग पाहिजे. ग्रामस्थांचा कोणताही गैरफायदा कंपनी उठवू नये यासाठी समिती स्थापन केली आहे. कंपनीने बाधित मुलांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. कंपनीच्या मालकाने देखील कधीतरी रत्नागिरीमध्ये यायला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणांमध्ये कंपनी दोषी आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या मंत्र्यांची नावे ठरली आहेत, तर त्यांनी नावे सांगावी मी अभिनंदन करतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शरद पवार भेटीचा राजकीय अर्थ लावण्याची गरज नाही, तसे काही असेल तर लवकर कळेल. आम्ही तत्वाने शरद पवार यांच्या विरोधात आहोत. पण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान असल्याचे देखील उदय सामंत यांनी म्हंटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता नक्की येणार आहे. महायुतीचे हिंदुत्व बेगडी असते तर आम्ही 234 वर गेलो असतो का? पराभव मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात झालेल्या आंदोलनात उबाठा कुठे सामील होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Share

-