वसमत येथे सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर दगडफेक:पोलिस उपाधिक्षकालाच जिवे मारण्याची धमकी; 12 जणांवर गुन्हा दाखल, 9 जण ताब्यात

वसमत येथे सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर दगडफेक होत असतांना घटनास्थळी दाखल झालेल्या उपाधिक्षकांवर दगडफेक करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या १२ जणांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. १६ पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील कैलास काबरा यांनी सोशल मिडीयावर जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी वादग्रस्त पोस्ट टाकली होती. यावरून एका जमावाने त्यांच्या घरी जाऊन दगडफेक सुरु केली. यामध्ये घरासमोर दगडाचा खच पडला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक महाजन, उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उपाधिक्षक केंद्रे हे जमावाला शांत करीत असतांना त्यातील काही जणांनी पोलिसांवरच दगडफेक केली. यामध्ये केंद्रे हे जखमी झाले. यावेळी तुम्ही येथून निघून जा अन्यता तुम्हाला येथे जिवे मारूत अशी धमकीही दिली. तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी उपाधिक्षक केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी शेख मोहसीन, खादील अख्तर, शेख अरबाज, शेख नदीम, मोहम्मद शोएब, मुशरफ फारुखी, मोहम्मद सोहेल, शेख अजीम, अरबाज शेख उर्फ बब्बी, जुनेद, अरफात शेख, सय्यद आवेज यांच्या विरुध्द शासकिय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले असून सहाय्य पोलिस निरीक्षक महाजन पुढील तपास करीत आहेत. वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा या घटनेमध्ये सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या कैलास काबरा याच्या विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड पुढील तपास करीत आहेत.

Share

-